करोना संपेपर्यंत सर्वसामान्यांना मुंबई लोकल प्रवासबंदी?; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : मुंबईत करोनाची संसर्ग कमी होत असून रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली असल्याने सध्या सर्वांनाच लोकल कधी सुरु होणार याची प्रतिक्षा लागली आहे. अद्याप लोकलने प्रवास करण्याची परवानगी मिळत नसल्याने अनेक चाकरमान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. दरम्यान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी करोना संपल्याशिवाय मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होणार नाही असं स्पष्ट सांगितलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दरम्यान पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनीही लोकल इतक्यात सुरू करण्याबाबत असमर्थता दर्शवली होती. लोकल सुरू करताना ती टप्प्याटप्प्याने म्हणजेच आधी महिलांसाठी किंवा विशिष्ट कर्मचाऱ्यांसाठी अशा पद्धतीने सुरू केली जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. मात्र मुंबईत रुग्णसंख्या कमी होत असली तरी टप्पा तीनचेच निर्बंध सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याने लोकलने प्रवास करण्यासाठी वाट पहावी लागणार असल्याचं स्पष्ट आहे.
मुंबईत निर्बंध कायम
मुंबईतील करोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मुंबईत सोमवारपासून सध्याच्या निर्बंधांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. राज्य सरकारच्या निकषांनुसार मुंबईचा समावेश आता टप्पा एकमध्ये झालेला असला तरी तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवल्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी टप्पा तीनचेच निर्बंध सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील लोकल कधी सुरू होणार?; महापौर किशोरी पेडणेकर म्हणतात…
गेल्या दोन महिन्यांपासून लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यासाठी राज्य सरकारने दोन आठवडय़ांपूर्वी निकष तयार केले होते. तेव्हा मुंबईत बाधितांचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा जास्त होते. मात्र दोन आठवडय़ांनी मुंबईतील परिस्थिती सुधारत असून बाधितांचे प्रमाण घटले आहे. असे असले तरी मुंबईला तिसऱ्या टप्प्याचेच निर्बंध लागू करण्याचे पालिकेने ठरवले आहे. त्यामुळे दुकाने, आस्थापना, खासगी कार्यालये यांच्यावर सध्याचेच निर्बंध राहणार आहेत.
मुंबईतील बाधितांचे प्रमाण कमी झाले असले तरी लोकसंख्या खूप जास्त असल्यामुळे अजूनही दरदिवशी ६०० ते ७०० नव्या रुग्णांची नोंद होते आहे. ही संख्या दर दिवशी दीडशे ते दोनशेवर आल्यास किंवा रुग्णांचे प्रमाण दोन टक्क्यांच्या खाली आल्यास निर्बंध शिथिल करण्याचा विचार होईल, असेही आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी सूतोवाच केले होते.