मुंबईस्थित हाफकिन बायोफार्माला कोव्हॅक्सिन लस उत्पादनासाठी १५९ कोटींचं अनुदान!
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : देशात करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाउनच्या नियमात शिथिलता आणली आहे. मात्र अजूनही संपूर्ण अनलॉक करण्याची स्थिती नाही. त्यामुळे अनेक राज्यांनी लसीकरण मोहीम आणखी गतीने वाढवण्याची मागणी केली आहे. मात्र लशींचा तुटवडा असल्याने अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद आहेत. त्यासाठी लस उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आता मुंबईस्थित हाफकिन बायो फार्मास्युटीकल कॉर्पोरेशन लिमिटेडला करोनावरील कोव्हॅक्सिन लसीचे एका वर्षात २२.८ कोटी डोस तयार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे उत्पादन मुंबईतील परेल कॉम्प्लेक्समधील कंपनीत करण्यात येणार आहे. यासाठी या कंपनीत पूर्ण तयारी करण्यात आली आहे.
हाफकिन बायोफार्माला यासाठी १५९ कोटींचं अनुदान जाहीर करण्यात आल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. हाफकिन बायोफार्माला भारत बायोटेक लिमिटेडनं हस्तांतरण व्यवस्थेनुसार कोव्हॅक्सिन लस उत्पादनाचं तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं आहे. कोव्हॅक्सिन लस उत्पादनासाठी हाफकिन बायोफार्माला देण्यात येणाऱ्या एकूण अनुदानात केंद्र सरकारकडून ६५ कोटी तर महाराष्ट्र सरकारकडून ९४ कोटी रुपयांचा वाटा आहे. “कंपनीला लसनिर्मितीसाठी ८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. लस उत्पादनासाठी दोन टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. लस निर्मितीसाठी आवश्यक औषधांची निर्मिती आणि त्यानंतर लस निर्मिती असे दोन टप्पे असणार आहे. औषध निर्मितीसाठी बायो सेफ्टी लेव्हल पाळणं गरजेच आहे. हाफकिनकडे याबाबतची योग्य सुविधा आहे.” असं कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संदीप राठोड यांनी सांगितलं. हाफकिन फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड ही १२२ वर्षे जून्या हाफकिन संस्थेची शाखा आहे. देशातील सर्वात जुन्या बायोमेडिकल संशोधन संस्थांपैकी एक आहे. प्लेगवरील लसीचा शोध लावणाऱ्या रशिय़न बॅक्टेरियोलॉजिस्ट डॉ. वॉल्डेमार हाफकीन यांच्या नावावरून या संस्थेला नाव देण्यात आले आहे.