मुंबई लोकलवर विषारी वायूच्या हल्ल्याचा दहशतवाद्यांचा कट, गुप्तचर विभागाच्या सूचना
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : दिल्ली येथून सहा दहशतवाद्यांना अटक केल्यापासून मुंबईसह सर्व प्रमुख शहरांतील सुरक्षा यंत्रणा सावध झाल्या आहेत. मुंबईत दहशतवाद विरोधी पथक आणि गुन्हे अन्वेषण शाखेने एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. त्याचवेळी मुंबई लोकलवर विषारी वायूच्या साहाय्याने हल्ला करण्याचा कट दहशतवाद्यांनी आखल्याची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर गुप्तचर विभागाने रेल्वे पोलिसांना सतर्कतेच्या सूचना दिल्याचे समजते. गुप्तचर विभागाच्या सूचनेनंतर मुंबई लोकल स्थानकांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काही संशयास्पद आढळल्यास कसून तपास केला जात आहे. रेल्वे स्थानकांवरील मुख्य प्रवेशद्वार वगळता इतर सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.
दिल्ली पोलिसांनी अलीकडे अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांनी मुंबई लोकलला लक्ष्य करण्यासाठी रेकी केली होती. गर्दीची ठिकाणे हे दहशतवाद्यांचे प्रमुख लक्ष्य असते हे यापूर्वीच्या हल्ल्यांतून स्पष्ट झाले आहे. यापूर्वीही मुंबई लोकलमध्ये बॉम्ब ठेवून हल्ले करण्यात आले होते. लोकल ट्रेनमध्ये विषारी वायू हल्ला करून किंवा गर्दीच्या स्थानकांवर भरधाव गाडीत घुसवून प्रवाशांना चिरडण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जोगेश्वरी (मुंबई) येथून झाकीर नावाच्या संशयित दहशतवाद्याला घेतले ताब्यात
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी जान मोहम्मद हा धारावीत रहाणारा आहे, असे असलेतरी राज्यातील अन्वेषण यंत्रणांना त्याची माहिती नव्हती का ? असा प्रश्न विचारत विरोधकांनी टीका केली होती. यानंतर १८ सप्टेंबरच्या पहाटे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकासोबत येथील जोगेश्वरी भागातून झाकीर नावाच्या एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे.