माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीकडून तिसरा समन्स, चौकशीला हजर राहण्याचे आदेश
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून (ED issues summons) तिसऱ्यांदा समन्स (summons) बजावण्यात आला आहे. येत्या ५ जुलैला देशमुख यांना ईडी (ED) कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अनिल देशमुख शनिवारी सकाळीच दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. ईडीच्या कारवाईतून सुटका करण्यासाठी देशमुख दिल्लीत कायदे तज्ञांची भेट घेणार असल्याची चर्चा आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरोपी सचिन वाझेने आणि माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या खंडणीच्या आरोपांवरुन अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने कारवाई सुरु केली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दोनवेळा ईडीने समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र प्रकृती आणि कोरोना प्रादुर्भावाचे कारण देऊन टाळाटाळ केली होती. देशमुख यांनी स्वीय्य सहाय्यकाच्या माध्यमातून आवश्यक कागदपत्र ईडीला पोहचवली आहेत. तसेच आपली चौकशी ऑनलाईन माध्यमातून करण्यात यावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली होती. सीबीआयकडून दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी देशमुख यांनी याचिका केली होती. याचिकेवर सुनावणी करताना देशमुख यांच्या वकिलांनी युक्तीवाद केला परंतु यावर पुढील सुनावणी ५ जुलै रोजी करण्यात येणार आहे.
अनिल देशमुख दिल्लीला
ईडीने सुरु केलेली कारवाई स्थगित करण्यासाठी तसेच चौकशीच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी अनिल देशमुख शनिवारीच दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीमध्ये कायदेतज्ज्ञांशी सल्ला घेणार असल्याची चर्चा सुरु आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ईसीआर देण्यात यावा
ईडीकडून समन्स बजावण्यात आल्यानंतर अनिल देशमुख यांनी आरोग्याचे कारण देत काही मागण्या केल्या होत्या. अनिल देशमुख यांनी ईडीला दोन सविस्तर पत्रे पाठवून 'ECIR' ची कॉपी द्यावी आणि त्यांना जी कागदपत्रे हवी आहेत त्यांची यादी द्यावी अशी विनंती केली आहे. जेणेकरून देशमुख यांना या कागदपत्रांची जुळवाजुळव करून ती ईडीला पाठविता येईल आणि चौकशीसाठी संपुर्ण सहकार्य करणार असल्याचे आवाहनही अनिल देशमुख यांनी पत्रातून म्हटलं होतं.