मराठवाड्यात पावसाने हाहाःकार : नद्या-नाल्यांना पूर, गावांचे संपर्क तुटले

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मराठवाड्यात पावसाने हाहाःकार : नद्या-नाल्यांना पूर, गावांचे संपर्क तुटले

औरंगाबाद, : मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी गावांचे संपर्क तुटले. तर काही ठिकाणी पूरस्थितीमुळे अनेक नागरिक अडकून पडल्याचे पाहायला मिळाले. परिस्थितीची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफसह बचाव पथकांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले.

विविध जिल्ह्यांतील परिस्थिती

बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतात पाणी घुसून दहा लोक शेतात असलेल्या घराच्या स्लॅबवर अडकले होते. या नागरिकांना वाचण्यासाठी बीड येथून बचाव पथक दाखल झाले. मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे अर्धे आपेगाव पाण्यात गेले. शेतात असलेल्या बालाजी बाजीराव तट, दत्ता काळदाते, मनोज काळदाते यांच्या शेतात काम करणारे सालगडीव त्यांचे कुटुंब पाण्यात अडकले होते. या तिघांच्याही शेतातील सालगडी आणि त्यांचे कुटुंब बालाजी तट यांच्या शेतात असलेल्या घराच्या स्लॅबवर बसले होते. आजूबाजूला चारही बाजूने पाणी वाढत होते. या लोकांना वाचवण्यासाठी बचाव पथक आपेगावात दाखल झाले आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाकडी गावात १७, तर सौदना गावात १० जण अडकले होते. मांजरा धरणाचे अचानक पाणी आल्याने हे नागरिक पुराच्या पाण्यात अडकले. औरंगाबादमधील बाबरा गावात मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी नदीपात्राच्या बाहेर आले. पाण्याचा वेग इतका जोरदार होता की, या परिसरात असलेल्या काही टपऱ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील नांद्रा कोळी येथे नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात दोन जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून संततधार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. राहुल चौधरी आणि भगवान गोरे असे बेपत्ता असलेल्यांची नावे आहेत. नाल्याच्या १०० मीटर अंतरावर त्यांची दुचाकी आढळल्याने हे दोघे जण वाहून गेले असल्याने त्यांचा शोध सुरू आहे. लातूर-उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उजनी गावाला लागून तेरणा नदी वाहते दरवर्षी या नदीला पाण्याची टंचाई असते. पण काल संध्याकाळी आणि रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसाने तेरणा नदीचं पाणी उजनी गावातील बाजारपेठेत शिरले असून या बाजारपेठेत असलेले हॉटेल्स, सलून, कृषी साहित्य विक्रीची दुकान पानटपरी आदी सरासरी २० ते २५ दुकानांत पाणी शिरले. या दुकानांतील साहित्य पुराच्या पाण्यात भिजून नुकसान झाले आहे. सरासरी गावाच्या मुख्य बाजारपेठेचा ५० टक्क्यांपर्यंत भाग हा पुराच्या पाण्यात बुडाला आहे.