भारताच्या हद्दीत 200 चिनी सैनिकांची घुसखोरी, भारताने घेतले ताब्यात
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली, : चिनी लष्करातील 200 सैनिकांनी तिबेटच्या सीमेजवळून भारतीय सीमेमध्ये घुसखोरी केली. यानंतर भारताने त्या सैनिकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. अरुणाचल प्रदेशच्या तवांग भागामध्ये ही घुसखोरी झाली आहे. या ठिकाणी सैनिक तैनात नसणाऱ्या बंकर्सची नासधूसही केली आहे.
भारत आणि चीनमधील सीमांची ठोस निश्चिती करण्यात आलेली नाही. दोन्ही देशांकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंदर्भात वेगवेगळे दावे केले जातात. दोन्ही देशांमधील समझोते आणि इतर करारांनुसार या ठिकाणी शांतता ठेवण्याला प्राधान्य असले तरी घुसखोरीबद्दल दोन्ही देशांमध्ये सीमा निश्चिती नसल्याने मतमतांतरे आहेत, असे सांगितले जात आहे. सध्या दोन्ही बाजूच्या सैन्यांकडून गस्त घातली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांना भिडल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी दोन्ही देशांमध्ये काही तासांच्या चर्चेनंतर यात तोडगा काढण्यात आला. सध्याच्या प्रोटोकॉलनुसार सामंजस्याने हा प्रश्न सोडवण्यात आला. चीनकडून भारतात घुसखोरीचे प्रयत्न केले जात असल्याचे सैनिकांच्या निदर्शनास आल्यानंतर दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांसमोर आले होते. तवांग परिसरात घुसखोरी करून भारतीय सीमेवर असलेल्या बंकर्सना उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. चीनचे 200 सैनिक भारतीय सीमेत घुसवण्याच्या प्रयत्नात होते, अशीही माहिती मिळत आहे.
गेल्या आठवड्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ बुमला आणि यांगत्से सीमेदरम्यान ही घटना घडली होती. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या सैनिकांना घुसखोरीचा प्रयत्न केल्यानंतर भारताने त्यांना अडवलं होते. त्यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती.
याआधीही केली आहे घुसखोरी
दोन्ही बाजूच्या गस्त घालणाऱ्या तुकड्या जेव्हा प्रत्यक्षात भेटतात तेव्हा ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे ते वागतात. या प्रदेशामध्ये चीनने अशाप्रकारे घुसखोरी करणं काही नवीन राहिलेले नाही. 2016 साली 200 हून अधिक चिनी सैनिक भारतीय सीमेमध्ये घुसले होते. मात्र काही तासांनंतर ते परत आपल्या प्रदेशात गेले. 2011 साली भारतीय सीमेमध्ये असणारी 250 मीटर उंच भिंत सर करण्याचा प्रयत्न चिनी सैनिकांनी केलेला तेव्हा सुद्धा भारताने आक्षेप नोंदवलेला.