बेस्ट बसगाडय़ांमधील पूर्ण आसनक्षमतेनुसार प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : कठोर निर्बंध आज, सोमवारपासून काहीसे शिथिल होत असल्याने बेस्ट प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे. बेस्ट बसगाडय़ांमधील पूर्ण आसनक्षमतेनुसार प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी दिल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. उभे राहून प्रवास करण्यास बंदी असेल.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध आले. त्यात बेस्टबसमधूनही ५० टक्के प्रवासी क्षमतेनुसार वाहतूक करण्याची परवानगी दिली होती. यामध्ये एका आसनावर एक प्रवासी व उभ्याने प्रवासी न घेण्याचा नियम होता. सर्वसामान्यांसाठी लोकल बंद, बेस्ट मार्गावरील एसटी गाडय़ांही कमी झाल्याने प्रवासी पूर्णपणे बेस्टवरच अवलंबून राहिले. परंतु ५० टक्के प्रवासी क्षमतेनुसार बस धावत असताना अनेक गैरसोयिंचा सामना प्रवाशांना करावा लागला. ऐन गर्दीच्या वेळी चालक, वाहक प्रवास नाकारत असल्याने प्रवासी त्यांचे न ऐकताच बसमध्ये प्रवेश करत होते. त्यामुळे काही मार्गावरील बसगाडय़ांना गर्दी होत होती. त्यात एका आसनावर दोन प्रवासी किं वा उभ्यानेही प्रवासी प्रवास करत असल्याने वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होत होते. मात्र सोमवारपासून १०० टक्के आसनक्षमतेनुसार बसगाडय़ा चालवल्या जाणार असल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
लोकल अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी
तिसऱ्या टप्प्यात समावेश असल्याने मुंबई उपनगरीय रेल्वे अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठीच उपलब्ध होणार आहे. सामान्य प्रवाशांना या सेवेची आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल. फक्त अत्यावश्यक सेवांसाठी लोकल असल्याने अन्य प्रवाशांना बेस्ट, एसटी, रिक्षा, टॅक्सींवरच अवलंबून राहावे लागत आहे.
मेट्रो फेऱ्यांमध्ये वाढ
घाटकोपर ते वर्सोवा ते अंधेरी मेट्रोच्या फेऱ्यांत आज, सोमवारपासून वाढ होणार आहे. मेट्रोच्या सध्या दिवसाला १०० फे ऱ्या होत होत्या. आता यात ३० टक्के वाढ करण्यात येत असल्याचे मुंबई मेट्रो वनकडून सांगण्यात आले.