दीड वर्षांनी शाळांची घंटा वाजणार; लसीकरण पूर्ण झालेल्या शिक्षक, कर्मचा-यांनाचं शाळेत प्रवेश मिळणार
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
पुणे : पुण्यासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. पालकांसह संस्थाचालकांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या टाक्स फार्ससोबत चर्चा करून अखेर येत्या 4 ऑक्टोबर पासून इयत्ता पहिलीपासून सर्व वर्गांच्या शाळा, कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे लसीकरण पूर्ण असणे बंधनकारक आहे. या संदर्भात शिक्षण विभागाच्या वतीने स्वतंत्र व सविस्तर आदेश काढण्यात येतील असे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी येथे स्पष्ट केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांनी वरील माहिती दिली. पवार यांनी सांगितले की, गणेशोत्सवनंतर कोरोना रुग्णांची संख्या कशी राहणार याबाबत येत्या 1 ऑक्टोबरला आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर कोरोनाचे निर्बंध आणखी शिथिल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. जिल्ह्यात एक कोटी लोकांचा लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. याबाबत प्रशासन करत असल्या कामाबाबत आमदार-खासदारांनी समाधान व्यक्त केले आहे. तिस-या लाटेची देखील प्रशासनाची तयारी सुरू आहे.
लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांसाठी स्वीमिंग पूल खुले होणार
सध्या खेळाडूसाठी सार्वजनिक स्वीमिंग पूल सुरू केले आहेत. यापुढे कोरोना लसीकरण पूर्ण झालेल्या सर्वच नागरिकांसाठी स्वीमिंग पूल खुले करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
दोन डोसमधील अंतर कमी करण्यासाठी केंद्राला पत्र
पुण्यासह संपूर्ण राज्यातच कोरोना लसीकरण चांगल्या प्रकारे सुरू आहे. परंतु सध्या पहिला डोस घेतल्यानंतर तब्बल 84 दिवस थांबावे लागते, त्याशिवाय पुढील डोससाठी नोंदणीच होत नाही. आता लस उपलब्ध होत असल्याने राज्य शासनाच्या वतीने केंद्राला पत्र पाठवून दोन डोस मधील अंतर कमी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
विनामास्क फिरणा-यावर कडक कारवाई
जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी होत असल्याने आता बहुतेक निर्बंध शिथिल केले आहे. तसेच लसीकरण देखील चांगले झाले आहे. रुग्ण संख्या वाढीचा वेग खूपच कमी झाला आहे. ही परिस्थितीत अशी सुधारावी यासाठी मास्क वापरणे बंधनकारक आहेच. यामुळेच यापुढे विनामास्क फिरणा-यांवर अधिक कडक कारवाई करण्याच्या सूचना पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांना देण्यात आल्या असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.