दिल्लीचं मिशन अनलॉक; मुख्यमंत्री केजरीवालांचा मोठा निर्णय
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
दिल्ली : करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतला लॉकडाउन हळूहळू उठवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. दिल्लीतल्या करोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.
आज त्यांनी पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती दिली. दिल्लीतल्या रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाउन करण्यात आला होता. मात्र, आता रुग्णसंख्या कमी होत असल्यानं दिल्लीतला लॉकडाउन टप्प्याटप्प्याने हटवण्यात येईल. केजरीवाल यांनी सांगितलं की आम्ही दिल्लीची जनता आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने दिल्लीतला लॉकडाउन हळूहळू हटवणार आहोत. मात्र, यावेळी करोना रुग्णसंख्या पुन्हा वाढणार तर नाही ना याची काळजी घेतली जाईल.
मुख्यमंत्री केजरीवाल पुढे म्हणाले, दिल्लीतल्या करोना रुग्णांच्या संख्येत आता मोठी घट होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये बाधित आढळण्याचा दर १.५ टक्क्यांवर आला आहे तर जवळपास ११०० रुग्ण बाधित आढळले आहेत. करोना विरुद्धच्या या लढाईमध्ये दिल्लीवासियांची मेहनत फळाला येत आहे. दिल्लीतली परिस्थिती सुधारत चालली आहे. आणि म्हणूनच दिल्ली आता अनलॉकसाठी सज्ज आहे. बांधकाम क्षेत्र आणि कारखाने सोमवारपासून सुरु करण्यात येतील.
केजरीवाल म्हणाले, आपल्याला हे लक्षात ठेवायला हवं की करोना फक्त कमी झाला आहे, संपलेला नाही. म्हणूनच आपण दिल्लीला हळूहळू अनलॉक करत आहोत. एकावेळी उठवला तर लागण होण्याचं प्रमाण वाढू शकतं. या अनलॉकसाठी आम्ही मजुरी करणाऱ्या, गरीब लोकांना समोर ठेवून विचार केला आहे.