मुख्यमंत्री बोम्मईंनी घेतली केंद्रीय अर्थमंत्री, आरोग्य मंत्र्यांची भेट

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुख्यमंत्री बोम्मईंनी घेतली केंद्रीय अर्थमंत्री, आरोग्य मंत्र्यांची भेट

नवी दिल्ली : कर्नाटकचे नवनियुक्त मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांची सदिच्छा भेट घेतली. वेगवेगळ्या झालेल्या या बैठकीत कर्नाटक सह विविध विषयांवर चर्चा झाली.
अर्थमंत्री सीतारामन राज्यसभेत कर्नाटकच्या प्रतिनिधी आहेत.
या संदर्भात ट्वीटरद्वारे माहिती देताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, "नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट झाली. वस्तू सेवा कर परतावा आणि केंद्र पुरस्कृत योजना तसेच राज्यास महत्वाच्या अन्य विषयांवर चर्चा केली.
दोन दिवसांच्या नवी दिल्ली दौऱ्यात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांची भेट घेत कोरोना प्रबंधन, लसीकरण, लसपुरवठा आणि आवश्यक औषधांची उपलब्धता यासह अन्य विषयांवर चर्चा केली."  आगामी मंत्रिमंडळ विस्तार आणि रचनेसंदर्भात माध्यमांशी बोलताना बोम्मई म्हणाले की, या संदर्भात लवकरच निर्णय होईल. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर बोम्मई दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी नवी दिल्लीत होते. शुक्रवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, प्रल्हाद जोशी तसेच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची सदिच्छा भेट घेतली. यासोबत कर्नाटक राज्यातून आलेल्या मंत्री आणि दोन्ही सभागृहातील भाजप खासदारांशी त्यांनी संवाद साधला.