जागतिक युवा अॅथलेटिक्स स्पर्धा : शैली अंतिम फेरीत
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नैरोबी : भारताच्या शैली सिंगने शुक्रवारी जागतिक युवा अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेतील (२० वर्षांखालील) महिलांच्या लांब उडीच्या शर्यतीत अंतिम फेरीत प्रवेश केला. नंदिनी अगसाराला मात्र १०० मीटर अडथळा शर्यतीत अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले.
शैलीने ६.४० मीटर इतक्या अंतरावर उडी मारून पात्रता फेरीत अग्रस्थान मिळवले. १७ वर्षीय शैलीने पहिल्या प्रयत्नात ६.३४ मीटर, तर दुसऱ्या प्रयत्नात ५.९८ मीटर इतके अंतर गाठले. मात्र अखेरच्या उडीमध्ये तिने सर्वोत्तम झेप घेत रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. स्वीडनची माजा अस्काग आणि ब्राझीलची लिसांड्रा कॅम्पोस यांनी पात्रता फेरीत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला.
नंदिनीने महिलांच्या १०० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत दिवसाच्या सुरुवातीला उपांत्य फेरी गाठली. परंतु सायंकाळी १४.१६ सेकंद इतकी वेळ नोंदवत सहावा क्रमांक मिळवल्यामुळे नंदिनीला अंतिम फेरीसाठी पात्र होता आले नाही.
’ तेजस शिर्सेला पुरुषांच्या ११० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले.
’ पूजाने महिलांच्या १,५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ११वा क्रमांक मिळवला.
’ शन्मुगा श्रीनिवास पुरुषांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पाचव्या स्थानी आल्याने त्याची उपांत्य फेरीची संधी हुकली.
’ पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत सुनील जोलियाला ९:४९.२३ मिनिटांसह ११व्या स्थानी समाधान मानावे लागले.