टोसिलीझुमॅब इंजेक्शन रुग्णालयातून बाहेर नेण्यास मनाई- जिल्हाधिकारी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नाशिक : एकदा वितरकाकडून टोसिलीझुमॅब इंजेक्शन प्राप्त करून घेतल्यानंतर ते इंजेक्शन रुग्णालयाच्या बाहेर जाणार नाही आणि त्याचा वापर जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका अधीक्षक नाशिक व मालेगाव यांच्यामार्फत शिफारस करण्यात आलेल्या रुग्णाकरीताच होत असल्याबाबतची खतरजमा वेळोवेळी या यंत्रणांनी त्यांच्या अधिनस्त पथकांकडून घेणेबाबतचे आदेश आज जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत. यासंदर्भात जारी केलेल्या आदेशात जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी नमुद केले आहे की, ज्या रुग्णालयात रुग्ण दाखल आहे अशा रुग्णालयांची तपासणी करून याबाबत खात्री करावी. यामध्ये त्रुटी आढळल्यास त्वरीत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात कळवावे. ज्या रुग्णासाठी सदर इंजेक्शन वाटप करण्यात आले आहे अशा रुग्णासाठी त्याचा वापर न झाल्यास सदर इंजेक्शन रुग्णालयाकडेच जतन करणे आवश्यक राहील. त्याचा परस्पर अन्य रुग्णासाठी वापर करणे अथवा विक्री करणे प्रतिबंधित राहील. तसेच ज्या रुग्णालयातील रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात आले आहे त्या रुग्णाचे नाव रुग्णालयातील फलकावर नमुद करावे, असेही आदेशात नमूद केले आहे. या सुचनांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आल्यास अथवा मंजूर केलेले इंजेक्शन रुग्णालया व्यतिरिक्त अन्यत्र आढळून आल्यास संबंधित सर्व व्यक्ती आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत फौजदारी कारवाईस पात्र ठरतील याची नोंद घ्यावी. ही बाब सर्व रुग्णालय चालकांचे निदर्शनास आणून द्यावी व अशी बाब आढळून आल्यास त्यानुसार कारवाई करून अहवाल सादर करावा, असेही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी या आदेशात नमूद केले आहे. रुग्णालयांनी दैनंदिन वापराची माहिती सादर करावी : कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तीसाठी ज्या ज्या वेळी टोसिलोझमॅब इंजेक्शनचा वापर करण्यात येईल त्या त्या दिवशी त्याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाद्वारे दिलेल्या नमुन्यात एक रजिस्टर ठेवून तसेच संगणकीकृत एक्सेल शीट मध्ये जतन करून त्याचा दररोज प्रिंट आऊट घेऊन बॉक्स फाईल मध्ये अद्यावत जतन करावी. ज्यात कालअखेरचा शिल्लक साठा ज्यावेळी तपासणी साठी समक्ष प्राधिकारी येतील त्यावेळेला हे रजिस्टर तपासणीसाठी उपलब्ध करून द्यावे. या इंजेक्शन वापरासाठी रुग्णालयात प्राप्त झालेवर त्याचा त्याच रुग्णासाठी वापर न झाल्यास सदर इंजेक्शन विहीत पद्धतीने जतन करून ठेवावे. सदर इंजेक्शन ते वाटप करण्यासाठी शिफारस करणान्या सक्षम अधिकारी यांचे पुर्व परवानगी शिवाय सदर इंजेक्शन इतर रुग्णास वा रुग्णाल्नयास हस्तांतरीत करू नये, तसेच ज्या रुग्णालयातील रुग्णांना वरील इंजेक्शन देणेत आले आहेत त्या रुग्णाचे नाव रुग्णालयातील फलकावर नमुद करावे. या सुचनांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आल्यास अथवा मंजूर केलेले इंजक्शन रुग्णालया व्यतिरिक्त अन्यत्र आढळून आल्यास संबंधित सर्व व्यक्ती आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत फौजदारी कारवाईस पात्र ठरतील याची नोंद घ्यावी, असेही यासंदर्भात निर्गमित केलेल्या दुसऱ्या आदेशात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आदेशीत केले आहे. अशाच प्रकारच्या सूचना रेमडेसिव्हिर या औषधाबाबत यापूर्वीच सर्व रुग्णालयांना देण्यात आलेल्या आहेत. हिंदुस्थान समाचार