कोकण विभागानं मारली बाजी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
सर्वोच्च न्यायालयाने बारावीचे निकाल लावण्याची ठरवून दिलेली ३१ जुलैची मुदत उलटल्यानंतर महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी लागणार? याची उत्सुकता विद्यार्थ्यांना होती. अखेर आज शिक्षण विभागाने राज्यातील १२वीच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले असून संध्याकाळी ४ वाजल्यापासून संकेतस्थळावर हा निकाल पाहाता येणार आहे. या निकालानुसार विज्ञान शाखेचा निकाल ९९.४५ टक्के, कला शाखेचा निकाल ९९.८३ टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल ९९.९१ टक्के इतका लागला आहे. याशिवाय, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल ९८.८० टक्के इतका लागला आहे. यानुसार, राज्याचा बारावीचा सरासरी निकाल ९९.६३ टक्के इतका लागला आहे. मात्र, विभागनिहाय आकडेवारीचा विचार करता राज्यात कोकण विभागानं पुन्हा बाजी मारली असून औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
कोकणचा निकाल ९९.८१ टक्के!
राज्यातील बारावीच्या निकालानुसार एकूण ९ विभागांपैकी कोकण विभागाचा निकाल ९९.८१ टक्के म्हणजेच सर्वाधिक लागला आहे. त्यापाठोपाठ मुबंई (९९.७९), पुणे (९९.७५), कोल्हापूर (९९.६७), लातूर (९९.६५), नागपूर (९९.६२), नाशिक (९९.६१), अमरावती (९९.३७) आणि औरंगाबाद (९९.३४) या विभागांचा क्रमांक लागतो.
दरम्यान, कोकण विभागात ९९.७३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून त्यापाठोपाठ ९९.५४ टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत. कोकणातील एकूण २७ हजार ३८४ विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करण्यात आलं असून त्यामध्ये १ हजार ८८७ मुलं तर १३ हजार ४९७ मुलींचा समावेश आहे. यापैकी १३ हजार ८५४ मुलं तर १३ हजार ४७८ मुली अर्थात एकूण २७ हजार ३३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
तक्रारींच्या निराकरणासाठी..
अंतर्गत मूल्यमापन पद्धतीद्वारे जाहीर केलेल्या निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या काही तक्रारी असल्यास त्यांच्या निराकरणासाठी मंडळाच्या स्तरावर व्यवस्था निर्माण करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्या अनुषंगाने राज्य मंडळाने विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विभागीय मंडळाच्या स्तरावर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. विद्यार्थ्यांना तक्रार नोंदवण्यासाठी टपाल, ई मेल किंवा व्यक्तिश: तक्रार नोंदवता येईल. त्यासाठीच्या अर्जाचा नमुना, तक्रारींचे निराकरण करण्यासाठीच्या अधिकाऱ्यांची नावे, संपर्क क्रमांक, ई मेल पत्ता आदी माहिती राज्य मंडळाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. तक्रारीचा अर्ज केल्यानंतर दहा दिवसांत त्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.