काँग्रेसची निष्क्रियता मोदींना लाभदायक
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
काँग्रेसने नुकतीच कोविडसंबंधात एक श्वेतपत्रिका जारी केली आहे. तिचे प्रकाशन करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ही श्वेतपत्रिका दोषदिग्दर्शनासाठी नसून सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी असल्याचे म्हटले होते. पण या श्वेतपत्रिकेची चर्चाही माध्यमांत फारच कमी झाली. काँग्रेसचे विरोधी पक्ष म्हणून असलेले महत्व ओसरले असल्याने असे झाले असावे. माध्यमांत हल्ली काँग्रेसला फारसे महत्व दिले जात नाहि. खरेतर काँग्रेस हा अजूनही मुख्य विरोधी पक्षच आहे. बाकी कोणत्याही विरोधी पक्षाचे देशभरात अस्तित्व नाहि. अंदमान निकोबारपासून ते हिमाचलप्रदेशपर्यंत काँग्रेसचे अस्तित्व आहे. आता ते मोदींच्या झंझावातामुळे भलेही ते क्षीण झाले असेल. पण आसामच्या दुर्गम भागातील आदिवासीलाही काँग्रेस आणि नेहरू माहित असतात. तरीही काँग्रेसच्या श्वेतपत्रिकेला कुणी महत्व दिले नाहि. पण चिंतेचा मुद्दा हा नाहि. मोदींबद्दल अनेक चांगल्या गोष्टी सांगता येतील. पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाला अनेक क्षेत्रांत पुढे नेले आहे. परंतु कोरोना संकटाचा मुकाबला करण्यात त्यांना अपयश आले आहे, हे कट्टर मोदी अनुयायीही मान्य करतील. मोदी यांना महामारीचा अंदाजच आला नाहि. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच केंद्र सरकारचे धोरण हे चाचपडण्याचेच होते. आजही तसेच आहे. लसीचा तुटवडा झाल्यावर एकवीस जूननंतर अचानक विक्रमी लसीकरण झाले. भाजपच्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लसीचा साठा लपवून ठेवला होता आणि मोदींच्या नावे विक्रम करता यावा म्हणून तो अचानक खुला करण्यात आला, असेही आरोप होत आहेत. यात कितपत तथ्य आहे, हे कुणीच सांगू शकणार नाहि. पेट्रोलचे दर शंभरीच्या वर गेल्याने लोकांची कंबरडी मोडून पडली आहेत. आधीच नोकर्या गेल्या आहेत तर काहींना अर्ध्या पगारावर काम करावे लागत आहे. त्यात पगाराचा पंचाहत्तर टक्के पैसा जर इंधनावर खर्च करावा लागत असेल तर लोकांक़डे इतर वस्तु खरेदी करायला पैसाच रहाणार नाहि. परंतु मोदी पेट्रोलच्या भावांबद्दल एक चकार शब्दही काढताना दिसत नाहि. मात्र असे असतानाही विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस काय करत आहे, या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच येईल. काँग्रेसचे कार्यकर्ते कोविडविरोधी संघर्षात कधीही दिसत नाहित. सोनिया गांधी यांनी नुकतीच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कोविड काळात लोकांपर्यंत मदत नेण्याचे आवाहन केले. पण त्याचा काहीच उपयोग नाहि. कारण कार्यकर्त्यांना जनतेपर्यंत पोहचायचे म्हणजे काय, हेच आता लक्षात राहिलेले नाहि. सामान्यांपर्यंत काँग्रेसवाल्यांची नाळ कधीच तुटून गेली आहे. सोनिया गांधी यांनी हे आवाहन केल्यानंतरही काहीच झाले नाहि. उगीचच बातम्यांमध्ये रहाण्यासाठी काँग्रेसचे मूठभर कार्यकर्ते आंदोलने वगैरे करतात आणि दुपारपर्यंत घरी जाऊन झोपतात. काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपने किमत देण्याचे कधीच सोडून दिले आहे. काँग्रेस हा विरोधी पक्ष म्हणून निष्क्रिय ठरला आहे आणि यामुळेच मोदी यांची लोकप्रियता इतक्या विपरित परिस्थितीतही जराही कमी झालेली नाहि. खरे म्हणजे विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसचे आज कधी नव्हे इतके महत्व वाढले आहे. परंतु काँग्रेसमध्ये ते समजून घेऊन कृति करण्याची क्षमता उरलेली नाहि. याचे कारण आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना गांधी घराण्याच्या नावावर मते मिळवून निवडून येण्याची वर्षानुवर्षे सवय लागली आहे. इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी यांची एक सभा मतदारसंघात लावली तरीही कार्यकर्त्यांना टाळ्या वाजवण्यापलिकडे काही काम नसायचे. उमेदवार हमखास निवडून यायचा. परंतु आज सोनिया किंवा राहुल गांधी यांच्यात आपल्या नावावर पक्षाला विजय मिळवून देणे तर राहूच द्या, पण चांगल्या जागा मिळवण्याचीही क्षमता उरलेली नाहि, हे दोन सार्वत्रिक निवडणुकांत दिसले आहे. तरीही काँग्रेस कार्यकर्ते आपली रक्तात भिनलेली सवय सोडायला तयार नाहित. सोनिया किंवा राहुल यांच्या नावावर आता काँग्रेसला कधीच मते मिळणार नाहित, हे ओळखून काँग्रेसने पुन्हा नव्याने उभारणी करायची सुरूवात केली पाहिजे. गांधी घराणे हे आता काँग्रेसला वाचवू शकत नाहि. त्यात जराही यश मिळाले की त्याचे श्रेय गांधी परिवाराला आणि अपयश आले की स्थानिक घटक जबाबदार, अशी मांडणी करण्याची लाचार काँग्रेसच्या नेत्यांना सवय लागली आहे. त्यामुळेही पक्ष म्हणून त्याची कामगिरी कशी झाली, याचे खरे मूल्यमापनच गांधी परिवार होऊ देत नाहि. परंतु यात ते पक्षाचे नुकसान करत आहेत, याचे त्यांना भान नाहि. कोविड काळात जी काही आंदोलने झाली ती सामान्य जनतेने केली. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी कार्यकर्ते त्यात कुठेही नव्हते. आताही नव्या कृषि कायद्यांविरोधात जे चिकाटीने आंदोलन चालवले आहे, ते शेतकर्यांनी स्वयंस्फूर्तीने चालवले आहे. यात पक्षाची भूमिका काहीच नाहि. मुख्य विरोधी पक्ष म्हणून काम करण्यात काँग्रेस पूर्णतः अपयशी ठरली आहे. ऑक्सिजन बेड्सची टंचाई असो की ऑक्सिजन सिलिंडर्सचा तुटवडा असो, जो काही सरकारविरोधात संघर्ष झाला तो काँग्रेसने केलेला नाहि तर जनतेने केला आहे. त्यामुळे पक्षाचे स्थान आपोआपच खाली गेले आहे. काँग्रेसने आता इथून उभारी घेतली तरच दोन हजार चोविसच्या निवडणुकीत सन्माननीय संख्येने जागा मिळवता येतील. पण काँग्रेस इतकी गलितगात्र झाली आहे की तिला हालचाल करण्याचीही शक्ति उरलेली नाहि. अशी काँग्रेस आहे तोपर्यंत मोदी निर्धास्त आहेत.