एक कुटुंबीय पक्षांची समस्या
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
भारतात एकाच कुटुंबावर चालणारे राजकीय पक्षांची संख्या कमी नाहि. प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक प्रांतात असे पक्ष सापडतात. ठाकरे कुटुंबाची शिवसेना ही तर अगदी प्रमुख आणि ठळक उदाहरण आहे. तिकडे तमिळनाडूत द्रमुक हा करूणानिधी यांच्या परिवाराचा पक्ष आहे तर तेलुगु देसम हा आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील अभिनेते एन टी रामाराव यांनी स्थापन केलेला पक्ष आहे. अण्णाद्रमुक हा अगोदर एम जी रामचंद्रन यांच्या करिष्म्यावर आणि नंतर जयललिता यांच्या करिष्म्यावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जरी राष्ट्रीय नेते मानले जात असले तरीही त्यांचा पक्ष हा पवार कुटुंबाचा पक्ष म्हणूनच मानला जातो. लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि मुलायमसिंग यादव यांचा समाजवादी पार्टी हे सारे पक्ष प्रादेशिक म्हणूनच गणले जातील. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस आणि डावे पक्ष सोडले तर हे सारे प्रादेशिक पक्ष आहेत. आणि अशा प्रादेशिक पक्षांच्या म्हणून काही वेगळ्या समस्या आहेत. याचे उदाहरण समोर आणले आहे ते चिराग पास्वान यांच्या लोकजनशक्ति पक्षाने. माजी केंद्रिय मंत्रि दिवंगत रामविलास पास्वान यांनी स्थापन केलेला हा पक्ष. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र चिराग यांनी या पक्षाची सूत्रे हाती घेतली. बिहार विधानसभा निव़डणुकीत भाजपच्या आशिर्वादाने त्यांनी आपल्या पक्षाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून म्हणजे एनडीएतून बाहेर काढले. स्वतंत्रपणे त्यांनी निवडणूक लढवली आणि याचा सर्वात जबरदस्त फटका बसला तो जेडीयूला. जेडीयूचे अनेक उमेदवार लोजप उमेदवारांमुळे हरले आहेत. अर्थात ही भाजपची चाल होती जेडीयूला धडा शिकवण्याची आणि त्यात भाजप कमालीचा यशस्वी झाला. राजकारणात असे पाडापाडीचे उद्योग चालतच असतात. पण जेडीयू यामुळे सावध झाला आणि आता त्यांनी चिराग पास्वान यांना त्यांच्याच पक्षात एकटे पाडले आहे. त्यांच्या पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी चिराग पास्वान यांनाच नेतेपदावरून हटवून चिराग यांचे काका पशुपती पारस यांना नेता म्हणून निव़डले आहे. याला भाजपचा आशिर्वाद असू शकतो. परंतु यात चिराग यांचे मात्र राजकीय जबर नुकसान झाले आहे. ही चाल जेडीयू किंवा भाजप यांनी आताच खेळण्याचे टायमिंग जबरदस्त आहे. राजकारणात सर्वात जास्त महत्व तर टायमिंगला असते. सध्या केंद्रिय मंत्रिमंडळ विस्ताराचे आणि फेरबदलाचे वारे वहात आहेत. त्यामुळे विस्तार झालाच तर चिराग पास्वान यांचा पत्ता आपोआपच कट झाला आहे. चिराग यांच्यासमोर आता दोनच पर्याय आहेत. एक तर तेजस्वी यादव यांच्या राजदशी हातमिळवणी करणे किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करणे. यातही काँग्रेसमध्ये जाऊन काहीच उपयोग नाहि. कारण तेजस्वी यादव यांनी काँग्रेसच्या ताकदीवर भरोसा ठेवून काँग्रेसला जास्त जागा बिहार विधानसभा निवडणुकीत दिल्या होत्या. काँग्रेसवर लोकांची इतकी नाराजी आहे की त्याचा फटका तुलनेने आशादायक नेतृत्व म्हणून उदयास येणार्या तेजस्वी यादव यांना बसला. ते सत्तेत येणार असल्याचे फार मोठे वातावरण माध्यमांनी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी तयार केले होते. सारेच तोंडघशी पडले आणि काँग्रेसमुळे तेजस्वी यांचा घात झाला. त्यामुळे हे उदाहरण समोर असल्याने चिराग काँग्रेसमध्ये जाऊन राजकीय आत्महत्या करणार नाहित. कदाचित ते तेजस्वी यादव यांना सामिल होतील. परंतु पास्वान जमातीची सारीच मते आता चिराग यांच्या पाठिशी नाहित. चिराग यांच्या नातेवाईकांकडेही पास्वान यांची मते आहेत. चिराग यांना सहानुभूती मिळवण्याचीही संधी नाहि. याचे कारण म्हणजे चिराग यांच्या नातेवाईक खासदारांनी एनडीएशी संबंध तोडलेले नाहित. फक्त त्यांना नेतृत्वावरून बेदखल केले आहे. कुटुंबावर आधारित पक्षांची अडचण हीच असते की, सामाजिक न्यायाचा मुखवटा केवळ आपल्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी केला जात असतो. या पक्षांच्या प्रमुखांचा अपमान केला किंवा त्यांचा पराभव झाला की जणू समस्त समाजाचा अपमान झाल्याची भावना पक्षातील चतुर नेते करून देत असतात. त्या जोरावर समाजाला भडकवणे सोपे जात असते. शिवसेनेला अडचणीत आणणारा एखादा निर्णय घेतला तर तो संपूर्ण राज्याला अडचणीत आणणारा निर्णय आहे, राज्याविरोधात षड्यंत्र आहे, अशी भावनिक हाकाटी शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाला मारता येते. शिवसेना हे एक उदाहरण झाले. कोणत्याही कुटुंबावर आधारित पक्षाला ही सोय आहे. एखादा नेता जेव्हा पक्ष स्थापन करतो, तेव्हा त्याच्या परिवारातील लोक गोळा होतात. त्यातीलच कुणी तरी त्या नेत्याच्या निधनानंतर नेता होतो. पण जर मूळ राजकीय नेत्याकडे असलेले राजकीय शहाणपण जर उत्तराधिकार्याकडे नसेल तर काय होते, याचे चिराग पास्वान हे एक उत्तम उदाहरण अभ्यासण्यासारखे आहे. त्याउलट उद्धव ठाकरे यांनी राजकीय शहाणपण दाखवून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पारंपरिक शत्रुंशी हातमिळवणी करून सत्ता मिळवली आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. मात्र हा त्यांचा मास्टरस्ट्रोक आहे की राजकीय आत्महत्या आहे, हे येणार्या निवडणुकीत ठरेल.