आर्यन खानने ‘या’ ठिकाणी लपवले होते ड्रग्ज
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना रविवारी अटक केली. प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. ‘एनसीबी’चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून चार विविध प्रकारच्या अमली पदार्थासह सुमारे दीड लाखाची रोख रक्कम जप्त करण्यात आली. आर्यनसह तिघांना रविवारी न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना ४ ऑक्टोबपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली. उर्वरित आरोपींना सोमवारी न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर ‘एनसीबी’ने शनिवारी ही कारवाई केली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी, २ ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला. त्यात पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड जप्त करण्यात आले आहेत. सशयितांच्या रक्ताचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
छापा टाकला असता अधिकाऱ्यांना आर्यन खानने डोळ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या लेन्सच्या डबीत ड्रग्ज लपवले असल्याचं समोर आलं. याशिवाय इतर आरोपींनी सॅनिटरी पॅड्स आणि औषधांच्या बॉक्समध्ये ड्रग्ज लपवले होते.
इंडिया टुडेने एनसीबीच्या सूत्रांनुसार दिलेल्या वृत्तानुसार, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने लेन्स बॉक्समध्ये ड्रग्ज लपवले होते. त्याला नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सब्स्टन्स अॅक्टच्या (NDPS) अंतर्गत अटक करण्यात आली.
दरम्यान आर्यन खानने आपल्या मित्रांसोबत चॅट करताना अनेकदा बेकायदेशीर ड्रग्जचा उल्लेख केल्याचंही समोर आलं आहे. धाड टाकल्यानंतर एनसीबीला चरस, कोकेन, एमडीएमए ड्रग्ज सापडले आहेत. आर्यन आणि त्याचा मित्र अरबाज एकाच खोलीत राहात होते. आर्यनवर सेवनाचा, तर उर्वरित दोघांवर अमली पदार्थ बाळगल्याचा आरोप आहे. जे. जे. रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करून आर्यन, अरबाज आणि मूनमून धमेचा यांना सायंकाळी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली. तीनही आरोपींना सोमवारी दुपारी पुन्हा न्यायालायापुढे हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे आर्यन खानसह मूनमून आणि अरबाज यांना रविवारची रात्र एनसीबीच्या कार्यालयातच घालवावी लागली. या कारवाईसंदर्भात कोर्डेलिया क्रूझचे मालक जुर्गेन बैलोम म्हणाले, की या प्रकरणाशी कोर्डेलिया क्रूझचा कोणताही संबंध नाही. आम्ही अशा कृत्यांचा निषेध करत असून भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी प्रयत्नशील राहू.