23 जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले, 16 प्रवाशांचा मृत्यू तर 7 गंभीर जखमी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मॉस्को: रशियामध्ये एक मोठा विमान अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 23 लोकांना घेऊन जाणारे विमान रशियाच्या टाटरस्तान भागात कोसळलं आहे. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला, तर 7 जण जखमी झाले आहेत. विमानात पॅराशूट जंपर्सचा एक ग्रुप जात होता. तातारस्तानवरुन उड्डाण घेताना या विमानाचा अपघात झाला.
रशियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियातील टाटरस्तान येथे रविवारी झालेल्या विमान अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आणि 7 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, मागील काही वर्षांत रशियन विमान सुरक्षा मानकांमध्ये सुधारणा झाली आहे, परंतु दुर्गम भागात जुन्या विमानांचे अपघात कमी झालेले नाहीत.
सप्टेंबरमध्ये रशियात विमान अपघातात 6 ठार
गेल्या महिन्यात रशियाच्या सुदूर पूर्वेला अँटोनोव्ह एन-26 वाहतूक विमान कोसळलं होतं, त्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर, जुलैमध्ये कामचटका येथे एका विमान अपघातात एंटोनोव्ह एन-26 ट्विन-इंजिन टर्बोप्रॉपमधील सर्व 28 जण ठार झाले होते. याशिवाय, 2019 मध्ये सुखोई सुपरजेट मॉस्को विमानतळाच्या धावपट्टीवर कोसळून आग लागली होती. त्या अपघातात 41 जणांचा मृत्यू झाला होता.