हिमाचलमध्ये पावसाचे रौद्र रुप; ढगफुटीमुळे घरांचे नुकसान, वाहने पाण्याखाली
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
हिमाचल : हिमाचलमध्ये पावसाचे रौद्र रुप पहायला मिळत आहे. हिमाचलच्या धर्मशाला येथील भागसू नाग येथे ढगफुटीमुळे मोठी आपत्ती निर्माण झाली असून नागरिकांना पूराचा सामना करावा लागत आहे. हिमाचलच्या छोट्या नाल्यांनी देखील नदीचे रुप धारण केले आहे. धर्मशालाच्या भागसू नाग येथे नाले ओव्हरफ्लो झाल्याने अनेक घरांचे मोठे नुकसान झाले असून अनेक वाहने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहेत. ढगफुटीमुळे अनेक हॉलेट्स त्याचप्रमाणे हिमाचलमध्ये आलेले पर्यटक त्यांच्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धर्मशाला परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे ते प्रचंड घाबरले आहेत. भागसू येथे मोठा गोंगाट आणि प्रचंड भितीचे वातावरण तयार झाले असून अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून तिथली सद्य परिस्थिती इतरांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यात अनेक घरांच्या बाहेर मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. घराबाहेर असणारी वाहने देखील पूराच्या पाण्यात वाहून जातानाची दृष्ये पहायला मिळत आहेत. ही दृष्य पाहून हिमाचलमध्ये सध्याच्या परिस्थितीचे भीषण रुप समोर येत आहे.