सलून, ब्युटी पार्लरमध्ये एसी सुरु ठेवल्यास कारवाई होणार; मुंबईच्या महापौरांचा इशारा
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : मुंबईत जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तिसऱ्या स्तरात असलेल्या मुंबईत दुकानांना ४ वाजेपर्यंत मुभा आहे. यामध्ये सलून, ब्युटी पार्लर आणि स्पा यांचाही समावेश आहे. दरम्यान त्यांना एसी सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. एसी सुरु ठेवल्यास कारवाईचा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. “सलून, ब्युटी पार्लर आणि स्पा यांना परवानगी देण्यात आली असून ४ वाजेपर्यंत सुरु असतील. मात्र त्यांना एसी सुरु ठेवण्यास परवानगी नाही. जर एसी सुरु असला तर दंडही होऊ शकतो. एसीच्या माध्यमातून विषाणूंचा फैलाव होण्याची शक्यता असते,” असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे. मुंबईत रात्री ८ नंतर जमावबंदी आणि संचारबंदी एकत्रित सुरु राहील असंही यावेळी त्यांनी सांगितलं.
“करोनाचा फैलाव टाळण्यासाठीच लोकल अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यासांठी सुरु असून बसमध्येही फक्त बसून प्रवाशाची परवानही आहे. उभं राहून प्रवास करण्या मनाई आहे. पाचव्या स्तरातून येणाऱ्या जिल्ह्यातील वाहनांना मुंबईत परवानगी नाही,” असंही त्यांनी यावेळी सांगितलं. “एवढ्या मोठ्या लॉकडाउननंतर आपण अनलॉक करत असताना काही नियम पाळले पाहिजेत. लोकांनी स्वयंशिस्त लावून घेतली तर पूर्ण अनलॉक होईल आणि मुक्त कारभार करु शकू,” असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला आहे. राज्यात अजूनही करोनाचे आव्हान संपलेले नाही. लोकांना थोडा दिलासा देण्यासाठी निर्बंध शिथिल करताना जे निकष आणि पाच स्तर ठरविले आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना केली. कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारंभात गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या, नियमांचे उल्लंघन खपवून घेणार नाही, अशी ताकीद मुख्यमंत्र्यांनी दिली.