शिवसुंदरकडे भारतीय महिला संघाचे फलंदाजी प्रशिक्षकपद
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
भारताचा माजी सलामीवीर शिवसुंदर दास याची आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील (एनसीए) अनुभवाचा फायदा महिला क्रिकेटपटूंना करून देण्यासाठी उत्सुक असल्याचे त्याने म्हटले आहे.
शिवसुंदरने २००० ते २००२ या कालावधीत भारताचे २३ कसोटी सामन्यांत प्रतिनिधित्व केले असून त्याने १३००पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. ‘‘महिला संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबादारी निभावताना खूप काही शिकायला मिळेल. या नव्या कामासाठी मी उत्सुक आहे,’’ असे शिवसुंदर म्हणाला.
राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली शिवसुंदरने ‘एनसीए’मध्ये फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. ‘‘एनसीएमध्ये मी गेल्या ४-५ वर्षांपासून कार्यरत असून द्रविडकडून खूप काही शिकायला मिळाले आहे. ही संधी दिल्याबद्दल मी ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुली यांचा खूप आभारी आहे. फलंदाजांना तांत्रिक समस्या सोडविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो,’’ असेही शिवसुंदरने सांगितले.