लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र?; शरद पवारांचं मोठं विधान
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावणाऱे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना आणि आपण एकत्र काम करु शकतो असं कोणाला पटलं नसतं असं म्हटलं आहे. आपण राज्याला वेगळ्या विचारांचं सरकार दिलं असून पुढील पाच वर्ष हे सरकार टीकेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
“आपण राज्याला वेगळ्या विचारांचं सरकार दिलं. शिवसेना आणि आपण एकत्र काम करु शकतो असं कोणला पटलं नसतं. पण आपण लोकांना पर्याय दिला आणि त्यांनी तो स्वीकारला. तिन्ही पक्षांनी योग्य पावलं टाकली आणि आज हे आघाडी सरकार चांगल्या रितीने काम करत आहे,” असं कौतुक शरद पवारांनी यावेळी केलं. सरकार झाल्यानंतर किती दिवस टिकणार अशी चर्चा सुरु होती अशी आठवण करुन देताना हे सरकार टीकेल आणि पाच वर्ष टीकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांसोबत स्वतंत्र बसले आणि चर्चा केली असं सांगत लगेच वेगवेगळ्या शंका घेण्यात आल्या असं सांगत शरद पवारांनी यावेळी टीकाकारांना उत्तर दिलं. “शिवसेनेसोबत आपण कधी काम केलं नाही पण महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणाराच आहे. ज्यावेळी जनता पक्षाचं राज्य आलं त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला असताना काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला….तो म्हणजे शिवसेना. नुसते पुढे आले नाहीत तर इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी शिवसेना एकही उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभा करणार नाही असा निर्णय घेतला. पक्षाचा नेता असा निर्णय घेतो तुम्ही विचार करा. पण त्याची चिंता कधी बाळासाहेबांनी केली नाही. त्यांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्द निवडणूक न लढवत पाळला. त्यामुळे कोणी काहीही शंका घेतली तरी शिवेसनेने ज्या पद्दतीने त्या कालखंडात भक्कमपणाची भूमिका घेतली तीच भूमिका सोडण्यासंबंधी कोणी सांगत असेल तर तसं होणार नाही,” असं शरद पवार म्हणाले आहेत.
“हे सरकार टीकेल आणि पाच वर्ष काम करेल. नुसतंच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करुन सामान्य जनतेचं देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचं काम करेल याबाबत शंका नाही,” असं शरद पवार यांनी सांगितलं.