निवडणूका स्वबळावर लढवण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केली भूमिका
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई दि. ९ राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या स्वबळावर लढविण्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यावर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.मात्र आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनीच याबाबत मोठा खुलासा करीत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही.मात्र स्थानिक परिस्थिती पाहूनच याबाबत स्थानिक नेते निर्णय घेतील आणि त्यानुसार पक्षाची भूमिका राहणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्ष वाढवण्यासाठी आणि पक्ष बळकट करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या स्वबळावर लढविण्याची घोषणा केली होती. मात्र पटोलेंच्या या निर्णयावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती.आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका जाहीर केली आहे.स्थानिक परिस्थितीनुसार या निवडणूका लढवल्या जाणार आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष विरुद्ध भाजप अशीच लढत सर्व ठिकाणी होणार अशी परिस्थिती नाही अशी पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचे मलिक यांनी सांगितले. काही ठिकाणी भाजपचे अस्तित्व नाही अशा ठिकाणी कॉंग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर लढतील. काही ठिकाणी राष्ट्रवादी - शिवसेना लढत होणार आहे.ज्याठिकाणी दोन पक्षाची,तीन पक्षाची आघाडी करायची गरज असेल किंवा स्वबळावर लढण्याची गरज असेल ती परिस्थिती बघून निर्णय होणार आहे असेही मलिक यांनी स्पष्ट केले.