राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे काम सर्वांसाठी आदर्श - उदय सामंत
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : कोरोना काळात राज्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) स्वयंसेवकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत उत्कृष्ट कार्य केले असून त्यांचे काम आपणा सर्वांसाठी आदर्श असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल मुंबई विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना जिल्हास्तरीय कोविड योद्ध्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होतो. त्यावेळी सामंत बोलत होते.
सामंत म्हणाले, कोरोना काळात राज्यातील सर्व विद्यापीठांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महत्वपूर्ण योगदान दिले आहे. एनएसएस स्वयंसेवकांनी, पोलीस मित्र, आरोग्य मित्र, महसूल मित्र म्हणून काम केले आहे. तसेच रक्तदान शिबीर, जनजागृती अभियान, परिसर निर्जंतुकीकरण , गरजूंना मास्क वाटप, भोजनाची व्यवस्था, अन्न वाटप, औषधांचे वाटप अशा प्रकारचे विविध उपक्रम राबविले आहेत.
सामाजिक कार्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करणे ही जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक अशा एकूण 37 एनएसएस स्वयंसेवकांचा जिल्हास्तरावर सन्मान होणार आहे. त्यानंतर यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या 13 कोविड योद्ध्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले. राज्यामध्ये सामाजिक चळवळ निर्माण करण्यात एनएसएसचा मोलाचा वाटा असून राज्यातील एनएसएसचा आदर्श देशभरातल्या इतर राज्यांनी घ्यावा, असे काम राज्यातील चार लक्ष स्वयंसेवक करीत असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले.