रमेडेसिविरचा पुरवठा मागणीच्या 40 टक्के
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
औरंगाबाद : गेल्या तीन दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या काहीशी स्थिरावली असल्याचे चित्र शहरी भागात दिसत असले तरी रुग्णालयास आवश्यक असणारा प्राणवायूच्या मागणीत अजूनही म्हणावी अशी घट दिसून येत नाही. बीड, लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील मागणीत किंचिंतशी वाढ झाली आहे. मराठवाडय़ातील आठ जिल्ह्यांत मिळणारा प्राणवायू 184 मेट्रीक टनाचा आहे तर झालेला वापर 190 मेट्रीक टनाचा आहे. पण स्थिरावलेल्या रुग्णसंख्येमुळे आणि होणाऱ्या पुरवठय़ामुळे श्वास अडणार नाही, असे चित्र दिसून येत आहे. दरम्यान रेमडेसिविरची टंचाई आणखी किती दिवस सुरू राहील या विषयी मात्र सर्व स्तरात अनिश्चितता दिसून येते. मागणीच्या प्रमाणात केवळ 40 टक्के पुरवठा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. औरंगाबाद शहरातील प्राणवायूचा वापर गेल्या आठवडय़ात 67 टनापर्यंत होता आता तो 60 टनापर्यंत खाली आला आहे.
मराठवाडय़ातील नांदेड, बीड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्याला मिळणारा प्राणवायू आणि होणारा पुरवठा यात अजूनही तूट आहे. ही तूट फारशी नसली नसली तरी वाहतुकीमध्ये एखादी जरी समस्या निर्माण झाली तर पुन्हा तुटवडय़ाची स्थिती निर्माण होऊ शकते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून प्राणवायू प्रकल्पही सुरू झाल्यानेही काहीसा दिलासा मिळाल्याचे अधिकारी सांगतात. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी प्राणवायूचा वापर कसा करावा, त्यात काटकसर कशी करावी याचे मार्गदर्शनही केले. तसेच काही खासगी रुग्णालयातील प्राणवायू वापराचे लेखापरीक्षणही केल्याने वापरात काहीशी घट होत असल्याचा दावा प्रशासकीय पातळीवरुन केला जात आहे. गेल्या महिनाभरातील प्राणवायू पुरवठय़ाची स्थिती आता काहीशी सुधारली असली तरी मराठवाडय़ातील चार जिल्ह्यांच्या पुरवठय़ावर अजूनही बारकाईने लक्ष ठेवावे लागत आहे. नांदेड, लातूर, बीड या तीन जिल्ह्यांत कोविड रुग्णसंख्याही फारशी कमी होताना दिसत नाही. सोमवारच्या दिवसात प्राणवायू मागणीमध्ये 29 टनापर्यंत घट आहे. त्याचा पुरवठा होत आहे. पण सध्या रेमडेसिविरची मागणी आणि पुरवठा यामध्ये सारे प्रशासन हैराण आहे.