राज्यात मिशन ऑक्सिजन राबविणार – मुख्यमंत्री
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
सिंधुदुर्ग : कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. शुक्रवारी सायंकाळी उशिरा सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते. तसेच कोरोनाची तिसरी लाट येऊच नये यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी सिंधुदुर्ग येथून पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी तत्परतेने आणि जलदगतीने सुविधा उभारण्याचे काम करत आहेत, याचे समाधान आहे. राज्यातील औषधांचा पुरवठा सुरळीत होईल पण सध्या महत्वाची गरज आहे ती ऑक्सिजनची. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील याची जबाबदारी महत्वाची आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांटची उभारणी होत आहे. ही चांगली बाब आहे. राज्यात सध्या मिशन ऑक्सिजन राबविण्यात येत आहे. जिल्ह्याची गरज ओळखून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवावा. कोरोना नियंत्रणात आला तरी गाफिल राहू नका, हा विषाणू घातक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा व निधी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्याला सध्या 4 टन ऑक्सिजन पुरवठा होत आहे. त्यामध्ये आणखी 2 टन वाढ करून जिल्ह्याला 6 टन ऑक्सिजन पुरवठा करावा तसेच एसडीआरएफचा निधीही सिंधुदुर्गला लवकर मिळावा अशी मागणी केली. नॉन कोविड रुग्णांसाठीही ऑक्सिजनचे नियोजन करावे. जिल्ह्यात सध्या माझा सिंधुदुर्ग माझी जबाबदारी मोहिम राबविण्यात येत आहे. त्या माध्यमातून कोरोना रुग्णांचा शोध घेतला जात असल्याचे पालकमंत्री श्री. सामंत यांनी सांगितले. सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासन मिळून कोविडचा सामना करत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा खनिकर्म निधीमधून घेण्यात आलेल्या 6रुग्णवाहिका, 50 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर यांचेही लोकार्पण करण्यात आले. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी प्रस्तावना केली, तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.