राज्यात चिकुनगुनिया, डेंग्यूचे वाढते रुग्ण
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : राज्यात डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव वाढला असून आतापर्यंत डेंग्यूमुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. डेंग्यूचे सर्वाधिक सहा मृत्यू नागपूरमध्ये, तर भंडारा, वर्धा, चंद्रपूर, ठाणे आणि नगरमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. या रोगाचे सर्वाधिक रुग्णही नागपूर विभागात आणि नाशिकमध्ये आहेत. मुंबईत जुलैच्या तुलनेत आता डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दुपटीहून अधिक वाढली आहे. मुंबईत डेंग्यूचे १३८ तर लेप्टोस्पायरोसिसचे १२३ रुग्ण आढळले.
दरवर्षी साधारण ऑगस्टमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढायला सुरूवात होते. गेल्यावर्षी जानेवारी ते डिसेंबर या काळात राज्यात ३३५६ डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. परंतु यावर्षी ऑगस्टमध्येच रुग्णसंख्या २५५४ वर गेली आहे. गेल्यावर्षी डेंग्यूमुळे दहा मृत्यू झाले होते, तर यावर्षी ऑगस्टमध्ये मृतांची संख्या आतापर्यंत ११ आहे.
एडिस जातीच्या डासाच्या माध्यमातून पसरणाऱ्या चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्याही गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत वाढली आहे. चिकुनगुनियाचे रुग्ण २०१९ मध्ये २९८, तर २०२० मध्ये ७८२ इतके आढळले होते, परंतु यावर्षी ऑगस्टमध्येच रुग्णांची संख्या ९२८ झाली आहे.
लेप्टोच्या रुग्णसंख्येत वाढ
राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे लेप्टाच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. २०२० या वर्षभरात राज्यात १०३ लेप्टोचे रुग्ण आढळले होते, तर यावर्षी ऑगस्टमध्ये रुग्णांची संख्या १८४ झाली आहे. लेप्टोमुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
मलेरियाचा प्रादुर्भाव
मलेरियाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली असून राज्यात ७१६९ रुग्णांना लागण झाली आहे. गेल्यावर्षी करोनाकेंद्री आरोग्य व्यवस्था झाल्यामुळे मलेरियाचा उद्रेक झाला होता. त्यामुळे २०२० मध्ये रुग्णांची संख्या सुमारे एक लाख २९ हजारावर गेली होती. त्या तुलनेत यावर्षी रुग्णांची संख्या कमी आहे. परंतु २०१९ च्या तुलनेत (४०७१ रुग्णसंख्या) मात्र हे प्रमाण जास्तच आहे.