महानिर्मिती राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई :महानिर्मिती कंपनीच्या राज्यातील विविध जागांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. तसेच महानिर्मितीकडून भाग भांडवल उपलब्ध करून देण्यासही मान्यता दिली.187 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांसाठी तसेच 390 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी दोन स्वतंत्र प्रस्तांवाना मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
कौडगाव, जिल्हा उस्मानाबाद येथे 50 मे.वॅ.क्षमतेचा, मौजे सिंदाला (लोहारा), जिल्हा लातूर येथे 60 मे.वॅ. क्षमतेचा तसेच औष्णिक विद्युत केंद्रामधील वापरात नसलेल्या जागेवर भुसावळ येथे 20 मे.वॅ., परळी येथे 12, कोरडी येथे 12, व नाशिक 8 मे.वॅ. असे एकूण 52 मे.वॅ.क्षमतेचे आणि मौजे शिवाजीनगर, साक्री जिल्हा धुळे येथे 25 मे.वॅ. क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प असे एकूण 187 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
या 187 मे.वॅ. क्षमतेच्या प्रकल्पांकरीता, मेसर्स. केएफडब्लू-बँक जर्मनी यांनी साक्री 150 मे.वॅ. क्षमतेच्या सौर प्रकल्पाकरीता केलेल्या प्रकल्प अर्थ सहाय्य करार वाढवून 2011 मधील शिल्लक प्रकल्प अर्थ सहाय्य मधून या प्रकल्पांना 588 कोटी 21 लाख रुपयांपर्यंत कर्जाची रक्कम केएफडब्लू बँक जर्मनीकडून घेण्यासही मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांकरिता राज्यशासनाच्यावतीने तसेच केंद्र शासनाच्या समन्वयाने व वित्त विभागाच्या सहमतीने करार करण्यास मान्यता देण्यात आली.हे प्रकल्प महानिर्मिती कंपनी मार्फत इंजिनीयरींग प्रोक्युरमेंट अॅण्ड कन्स्ट्रक्शन तत्वावर उभारण्यात येणार असून. या 187 मे.वॅ. क्षमतेच्या प्रकल्पांकारीता भाग भांडवल स्वरुपात सुमारे 158 कोटी 29 लाख रुपयांचा निधी महानिर्मितीच्या अंतर्गत स्त्रोतांतून अथवा वित्तिय संस्थाकडून कर्जाद्वारे उभारण्यास मान्यता देण्यात आली. केएफडब्लूबँक जर्मनी यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची महानिर्मिती कंपनीद्वारे परतफेड करण्यात येईल.
महानिर्मिती इंजिनीयरींगप्रोक्युरमेंट अॅण्ड कन्स्ट्रक्शन तत्वावर वाशिम जिल्ह्यातील मौजे दुधखेडा, मौजे परडी ता. कमोर, मौजे कंझारा येथे अनुक्रमे 60 मेगावॅट, 30 मेगावॅट व 40 मेगावॅट असे एकूण 130 मेगावॅट क्षमतेचे तसेच वाशिम-1 प्रकल्पांतर्गत मौजे बाभूळगांव व मौजे सायखेडा येथे प्रत्येकी 20 मेगावॅट असे एकूण 40 मेगावॅट क्षमतेचे तसेच वाशिम-2 प्रकल्पांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात मौजे कचराळा येथे 145 मे.वॅ. क्षमतेचा तर यवतमाळ जिल्ह्यात मौजे मंगलादेवी, मौजे पिंपरी इजारा व मौजे मालखेड येथे प्रत्येकी 25 मेगावॅट असे एकूण 75 मेगावॅट क्षमतेचे असे एकंदरीत 390 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे.
या प्रस्तावित 390 मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पांकरीता स्व-भागभांडवल वगळता 1564 कोटी 22 लाख रुपये खर्चासाठी केएफडब्लूबँक, जर्मनी यांच्याकडून 0.05 टक्के प्रतिवर्ष या दराने कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली. या कर्जाची कमाल 12 वर्षात परतफेड करण्याच्या अटीवर व नाविन्यपूर्ण प्रकल्प अटीनुसार नवीन प्रकल्प अर्थ सहाय्य मिळविण्याकरीताही मंजूरी देण्यात आली.या प्रकल्पांकरिता राज्यशासनाच्यावतीने तसेच केंद्र शासनाच्या समन्वयाने व वित्त विभागाच्या सहमतीने करार करण्यास मान्यता देण्यात आली. कर्जाव्यतिरीक्त लागणारे भाग भांडवल स्वरुपात सुमारे 364 कोटी 18 लाख रुपयांचा निधी त्यांच्या अंतर्गत स्त्रोतांतून अथवा वित्तीय संस्थाकडून कर्जाद्वारे उभारण्यासही मान्यता देण्यात आली. तसेच केएफडब्लूबँक जर्मनी यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची महानिर्मिती कंपनीद्वारे परतफेड करण्यात येईल.