…म्हणून मी सध्या हजर राहू शकत नाही; अनिल परब यांचं ईडीला पत्र
For Printing Download Epaper from files section from bottom of this page

रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना आज ईडीने चौकशीसाठी बोलवले होते. ईडीने नोटीस पाठवून हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अनिल परब चौकशीला गेलेच नाही. त्यांनी याबाबतचं कारण ईडी कार्यालयाला पत्राद्वारे कळवलं आहे. त्याचबरोबर हजर राहण्यासाठी १४ दिवसांचा अवधी मागितला आहे. अनिल परब यांनी वकिलांच्या माध्यमातून ईडीला पत्र पाठवलं आहे.
“मला २८ ऑगस्टला ईडी कार्यालयाकडून नोटीस मिळाली. त्यात ३१ ऑगस्टला ईडी कार्यालयात सकाळी ११ वाजता हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र या दिवशी माझा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने मी चौकशीला हजर राहू शकत नाही. त्यामुळे दोन आठवड्यानंतरची वेळ द्यावी.”, असं मंत्री अनिल परब यांनी पत्रात लिहिलं आहे. “नोटीशीत चौकशीचं कारण लिहिलं नाही. त्यामुळे चौकशीचं कारण स्पष्ट करावं. कारण मला चौकशीत योग्य माहिती देता येईल.”, असंही त्यांनी पुढे नमूद केलं आहे. दुसरीकडे, राज्यातील परिवहन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांना वायूवेग पथकांसाठी ७६ अत्याधुनिक वाहनांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज तथा बंटी डी. पाटील, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह आदी उपस्थित होते.