मुंबईत आज लसीकरण बंद
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : लशींचा तुटवडा असल्याने मुंबई पालिकेने आज, बुधवारी लसीकरण बंद ठेवले आहे. जुलैच्या तीन आठवड्यांमध्ये मुंबईतील लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची ही तिसरी वेळ आहे.
मुंबई पालिकेला गेल्या शुक्रवारी ४५ हजार लसमात्रा मिळाल्या होत्या. पावसामुळे शनिवारी लसीकरण कमी झाले. त्यामुळे हा लससाठा मंगळवारपर्यंत वापरण्यात आला. मंगळवारी आणखी लससाठा मिळणे अपेक्षित होते. परंतु, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत लससाठा मिळण्याबाबत कोणत्याही सूचना न मिळाल्यामुळे अखेर पालिकेने बुधवारी लसीकरण बंद ठेवले.
जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून लशींचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्याकडून जास्तीत जास्त एक ते दोन दिवसांचा साठा पुरवला जातो. दर काही दिवसांनी पालिकेकडील लससाठा संपला तरी पुढील साठा प्राप्त होत नाही. परिणामी लसीकरण बंद ठेवावे लागते. जुलैमध्ये पालिकेने आत्तापर्यंत तीन वेळा लसीकरण बंद ठेवले आहे. लसतुटवड्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातही अनेक शहरांत बुधवारी लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे.