भारतात डेल्टामुळे नवा करोनाउद्रेक
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : भारतात सध्या करोना साथ चालू राहण्यास व नव्याने काही ठिकाणी उद्रेक होण्यास डेल्टा विषाणूच कारणीभूत आहे, त्यामुळे लशीची परिणामकारकता कमी दिसत असून विषाणूचा प्रसार वाढत आहे, असे इन्साकॉग या संस्थेने म्हटले आहे.
इन्साकॉग ही संस्था जनुकीय क्रमवारी लावणाऱ्या संस्थांची शीर्षस्थ संस्था आहे. लसीकरणामुळे गंभीर आजार व मृत्यूची शक्यता कमी झाली असली तरी प्रसार कमी झालेला नाही. त्यामुळे लसीकरण गरजेचे आहे असे इन्साकॉगने १६ ऑगस्टच्या त्यांच्या वार्तापत्रात म्हटले आहे.
भारतात करोना विषाणूंच्या जनुकीय क्रमवारीचे काम इन्साकॉग ही संस्था करीत असून भारतात डेल्टा विषाणूचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. एकूण ३०,२३० नमुन्यांचे विश्लेषण केले असता त्यातील २०,३२४ नमुने डेल्टा विषाणूचे निघाले आहेत. भारतात एवाय १, एवाय २ एवाय ३ या डेल्टा प्लस विषाणूचे प्रकार महाराष्ट्रात जुलैमध्ये दिसून आले आहेत. त्यांचे प्रमाण एक टक्का होते. डेल्टा प्रजातीतील विषाणू आता आले असले तरी देशात डेल्टा प्लसचे ६१ नमुने आतापर्यंत सापडले आहेत.
लसीकरणाचा कमी होणारा प्रभाव, प्रसार रोखण्यातील उपायांत अपयश यामुळे डेल्टा विषाणूचा प्रसार वाढत आहे. दरम्यान उपचाराधीन रुग्णांची संख्या दीडशे दिवसांत नीचांकी म्हणजे ३ लाख ६३ हजार ६०५ झाली आहे. ती एकूण संसर्गाच्या १.१२ टक्के आहे. मार्च २०२० पासूनचा हा नीचांक आहे. देशात ५७ कोटी करोना लसमात्रा देण्यात आल्या आहेत. १४-१६ ऑगस्ट दरम्यान आर- मूल्य ०.८९ झाले आहे. देशात रोज २५ हजार रुग्ण दिसून येत आहेत. ब्रिटनची लोकसंख्या ६.७ कोटी असून तेथे एप्रिल २०२१ मध्ये डेल्टाचे रुग्ण सापडले होते. भारतातही लसीकरणानंतरही डेल्टाचे प्रमाण काही ठिकाणी वाढले आहे.