पुरात आत्तापर्यंत 436 जणांचे बळी; मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी दिली माहिती
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यातल्या काही विदर्भ- मराठवाडा भागाला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. या भागांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली आहे. अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत, तर जनजीवनही विस्कळीत झालेलं आहे. शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिकं जमीनदोस्त झाली आहे. याच नुकसानीचा आढावा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतला आहे. राज्यात झालेल्या नुकसानीची आणि पंचनाम्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार म्हणाले, 436 मृतांपैकी 6 जणांचे मृतदेह अद्याप हाती आलेले नाहीत. 136 जण जखमी झालेले आहेत. उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद आणि जळगाव इथं आपत्ती निवारण दल मदतकार्य करत होतं. उस्मानाबादमध्ये हेलिकॉप्टरद्वारे 16 तर बोटीद्वारे 20 जणांना वाचवण्यात आलं आहे. लातूरमध्ये हेलिकॉप्टरने 3 तर बोटीद्वारे 47 जणांचे प्राण वाचवण्यात यश आलं. औरंगाबादमध्ये 24 लोकांना बोटीद्वारे वाचवण्यात आलं. या महिन्यात 71 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर 26 जण जखमी झाल्याची नोंद आहे. लहान मोठे सर्व प्रकारच्या 57 जनावरांचा मृत्यू वीज पडून झाला आहे. तर 196 मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. 17 लाख हेक्टर जमिनीचं नुकसान झालं असून आत्तापर्यंत 81 टक्के पंचनामे झाले आहेत. पावसामुळे 19 टक्के पंचनामे बाकी आहेत. अजूनही काही माहिती प्राप्त होत आहे. हे नुकसान गुलाब चक्रीवादळापूर्वीचं आहे. 22 लाख हेक्टर शेती उध्वस्त झाली असल्याचा माझा अंदाज आहे.
ते पुढे म्हणाले, 381 महसूल युनिटमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. तर १२७ ठिकाणी चार वेळा अतिवृष्टी झाली असून काही ठिकाणी आठ वेळा अतिवृष्टी झाली आहे. रस्त्याचं मोठं नुकसान झालं असून वीजपंप वाहून गेलेत. जमिनी खरडल्यात. खरडलेल्या जमिनींचेही पंचनामे होणार आहेत. अनेक जलस्त्रोतांचे प्रवाह बदलले आहेत. रस्ते, पूल वाहून गेले असून सिंचन विभागाचेही मोठे नुकसान झाले आहे. आम्ही बऱ्याच वेळा केंद्राकडून मदतीची मागणी केली आहे. 2020 मध्ये गारपीट झाली होती, तेव्हाही केंद्राकडे मदतीची विनंती केली होती, मात्र केंद्राकडून पथक आलं नाही. निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानीसाठी 1 हजार 65 रुपयांची मागणी केंद्राकडे केली होती, त्यापैकी 268 कोटी 59 लाख रुपये प्राप्त झाले आहेत.