पाकिस्तानच्या हवेत उड्या
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
अफगाणिस्तानात तालिबान भयंकर कत्तल करून सत्तेवर आल्यापासून पाकिस्तानच्या हवेत उड्या मारणे सुरूच आहे. तालिबानची सत्ता पाकिस्तानच्या मदतीशिवाय शक्य नाहि, हे सर्वानाच ठाऊक होते. पाकिस्तानने सर्व प्रकारे मदत करून तालिबानला सत्ता मिळवून दिली. अफगाण सेना एकदम भित्रट आणि षंढ निघाल्याने तालिबान आणि पाकिस्तानचे फावले. त्यातही अमेरिकेने काढता पाय घेऊन आपली पळपुटी वृत्ती दाखवून दिली. या सर्वांचा परिपाक म्हणजे वीस वर्षांनंतर तालिबान अफगाणिस्तानात सत्तेत आले. आता मात्र पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि तालिबान यांचे जमलेले मेतकूट सार्या जगाला दाखवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे. आयएसआयचे प्रमुख नुकतेच अफगाणिस्तानात पोहचले आहेत. ते म्हणे तालिबानला नवीन सरकार बनवण्यासाठी मदत करणार आहेत. नवीन सरकार बनवतानाच तालिबानमधील संघर्ष उफाळून आला आहे. ज्याला अफगाणिस्तानचे प्रमुख केले जाणार होते, तो मुल्ला बरादर गोळीबारात जबर जखमी झाला आहे. त्याला पाकिस्तानात रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाकिस्तानचीच सत्ता आता अफगाणिस्तानात चालणार आहे, हे जगाला विशेषतः भारताला दाखवण्याचा पाकिस्तानचा उघड हेतू दिसत आहे. मुळात पाकिस्तान हे भिकारी बनले आह आणि त्याच्याकडे स्वतःचे असे काहीही नाहि. त्यामुळे बुडत्याला काडीचा आधार याप्रमाणे अफगाणिस्तानातील विजय हा काहीच नसलेल्या पाकिस्तानसाठी मोठा चमत्कारच आहे. अमेरिकेने आत्मघात केला नसता तर तालिबान कधीच विजयी झाले नसते. आयएसआय प्रमुख फैज हमिद यांच्या अफगाणिस्तान दौर्यात दोन्ही देशांमध्ये व्यापारी आणि राजनैतिक संबंधांचा नव्याने विकास करण्याचा हेतू असल्याचे सांगण्यात येत आहे. पण पाकिस्तानचा अंतस्थ हेतू वेगळा आहे, हे समजण्यासाठी अकलेची गरजच नाहि. आयएसआय ही दहशतवादी कारवाया करण्यासाठी कुख्यात आहे आणि तालिबानला भारताविरोधात कारवाया करण्यासाठी उद्युक्त करण्यासाठीच हमिद तेथे गेले आहेत, हे सार्या जगाला ठाऊक आहे. तालिबानने काहीही कारण नसताना कश्मिरातील मुसलमानांसाठी आवाज उठवण्याचा आम्हाला हक्क आहे, असे जाणिवपूर्वक भारताला डिवचणारे वक्तव्य केले आहे. याचा बोलवता धनी कोण आहे, हे वेगळे सांगण्याची गरजच नाहि. कश्मिरला स्वतंत्र दर्जा देणारे कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर पाकिस्तानला भलत्याच यातना झाल्या. पण तेव्हा तालिबानने अवाक्षरही काढले नव्हते. आताच असे वक्तव्य केले, याच्यामागे कुणाची प्रेरणा आहे, हे सहज लक्षात येते. पाकिस्तान तालिबानला हाताशी धरून भारताविरोधात पेटवत राहिल. याचे दोन फायदे त्याला होणार आहेत. एकतर पाकिस्तान पूर्व सीमेवर गुंतले आहे, असा भास त्याला आंतरराष्ट्रीय समुदायासमोर करता येईल. दुसरे म्हणजे तालिबानच्या काठीने भारताला थोडासा तरी धडा शिकवता आला तर पहावे, हा हेतू असावा. पण हे त्याचे दोन्ही हेतू साध्य होणार नाहित. मुळात तालिबानला अजून जागतिक मान्यता मिळायची आहे. आताच त्यांनी असा दहशतवाद इतर देशांत केला तर त्याला कधीच मान्यता मिळणार नाहि. तसेच कुणीच तालिबानशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करणार नाहि. अफगाणिस्तान हे भुकेकंगाल राष्ट्र आहे. त्याला इतर देशांनी मदत केली तरच ते उभे राहू शकते. त्यात तालिबान काहीच करू शकत नाहि. पाकिस्तान म्हणूनच तालिबानला दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. तालिबान आता सुधारले आहेत, वगैरे जी आंतरराष्ट्रीय पोपटपंची सुरू आहे आणि त्यात भारतातील काही विद्वान सामिल आहेत, त्यांचा हेतू तोच आहे. पण ज्या प्रकारे तालिबान हिंसाचार करत आहे आणि त्यांच्या गटांमध्येच रक्तरंजित संघर्ष सुरू आहे, त्यावरून खरे काय घडत आहे, ते समजतेच. आयएसआय आणि तालिबान यांच्यातील संबंध जगापासून लपून राहिलेले नाहित. मात्र आताइतक्या उघडपणे ते कधीही बाहेर आले नव्हते. पण आता आयएसआय खुलेपणाने अफगाणिस्तानात जी राजकीय ढवळाढवळ करत आहे, त्यावरून अफगाणिस्तानात आता पाकिस्तानचेच नाणे चालेल, हे दाखवण्याचा जगाला हेतू आहे, असे अनेक राजकीय तज्ञांचे मत आहे. १९९० च्या दशकापासून पाकिस्ताननेच तालिबानला पाळले आहे. अमेरिकेवर हल्ला करणारा ओसामा बिन लादेन अखेरीस पाकिस्तानच्या अबोटाबाद इथेच सापडला होता. त्यावरून दहशतवादाला कोण पोसते आहे, हे सार्या जगाला कळून चुकले आहे. पण आता पाकिस्तानने खुलेपणाने जगासमोर येण्याचे ठरवले आहे, असे दिसते. याहीपेक्षा आयएसआय प्रमुख अफगाणिस्तानात जाणे याचा अर्थ खरा विजेता आम्हीच आहोत, हे जगासमोर दाखवण्याचाही पाकिस्तानचा प्रयत्न आहे. ज्या काही वाटाघाटी करायच्या त्या आम्हाला वगळून करता येणार नाहित, असाही त्यातून इषारा द्यायचा आहे. हा इषारा एक प्रकारे चिनला ही आहे. कारण चिननेच तालिबानला पाठिंबा दिला आहे. या सर्व विवेचनाचा आपल्यासाठी अर्थ इतकाच की आपल्याला आता अफगाणिस्तानचा आता वेगळ्या संदर्भात विचार करावा लागणार आहे. पाकिस्तानचा अडथळा प्रत्येक वेळेला होत रहाणार. त्यामुळे आता पाकिस्तानशी जोरदार संघर्ष करण्याच्या इराद्यानेच आता आपले परराष्ट्र धोरण आखावे लागणार आहे. त्यातल्या त्यात एक सुखद बातमी आहे की भारत आणि अमेरिका यांचा संयुक्त युद्धसराव जोरात आहे. त्यामुळे लष्करी संबंध मजबूत झाले आहेत. पाकिस्तानची भारताला हरवण्याची मुळीच ताकद नाहि. पण तालिबानच्या सहाय्याने तो आणखी जरा जोर लावण्याचा प्रयत्न करणार. अन्यथा तालिबान पाकिस्तानलाच धडा शिकवू शकते. पाकिस्तान आज अफगाणिस्तानात आपलाच अधिकार चालेल म्हणून खुषीत गाजरे खात असला तरीही त्याने एक लक्षात ठेवले पाहिजे. पाकिस्तान हा विस्तवाशी खेळ खेळत आहे. तालिबान कधी त्यावर उलटेल, हे कुणीच सांगू शकणार नाहि.