दिल्लीत लॉकडाऊन पुन्हा वाढवला; मेट्रो सेवाही आठवडाभरासाठी बंद

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

दिल्लीत लॉकडाऊन पुन्हा वाढवला; मेट्रो सेवाही आठवडाभरासाठी बंद

दिल्ली: दिल्लीतील करोना स्थिती गंभीर होत चालली आहे. अपुऱ्या वैद्यकीय सुविधा आणि ऑक्सिजनची कमतरता असल्याने रुग्णांचे हाल होत आहे. तसेच दिल्लीत काळाबाजाराला देखील ऊत आला आहे. चढ्या किंमतीत वैद्यकीय उपकरणं आणि सेवा मिळत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासन हतबल असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा एकदा लॉकडाऊन एक आठवडा वाढवण्यात आलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली आहे. 17 मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार असून निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत.

दिल्लीत गेल्या १९ एप्रिलपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तीन वेळा हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. उद्या 10 मे रोजी हा लॉकडाऊन संपणार होता. मात्र करोना स्थिती पाहता हा लॉकडाऊन आणखी आठवडाभर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आठवडाभराच्या लॉकडाऊनमध्ये मेट्रो सेवाही बंद करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसात रुग्णांच्या संख्येत 23 ते 35 टक्क्यांनी घट झाल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं.

राजधानी दिल्लीत शनिवारी 17 हजार 364 नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. करोनामुळे 332 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 1हजारांच्या पार गेला आहे. सध्या दिल्लीत 87 हजार 907 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

देशात एका दिवसात ४ लाख ३ हजार ७३८ नागरिक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. काहीसा दिलासादायक बाब म्हणजे याच कालावधीत देशभरात ३ लाख ८६ हजार ४४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात सलग चौथ्या दिवशी चार हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या २४ देशात ४ हजार ९२ करोना रुग्णांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या आता २ लाख ४२ हजार ३६२ वर जाऊन पोहोचली आहे.