ठाण्यात फेरीवाल्यांवर महापालिकेची धडक कारवाई सुरूच
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
ठाणे :ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये शहरातील फेरीवाल्यांवर धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून प्रभाग समितीनिहाय कारवाईने चांगलाच वेग घेतला आहे. आज शहरातील विविध ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाई करून हातगाड्या, टपऱ्या तसेच स्टॉल तोडण्यात आले.
या कारवाईतंर्गत नौपाडा - कोपरी प्रभाग समितीमधील ठाणे स्टेशन रोड, सॅटिस परिसर, गोखले रोड, हरिनिवास सर्कल, तीन हात पेट्रोल पंप, राम मारुती रोड आणि गावदेवी मंदिर परिसर या ठिकाणी असणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करत ४ हातगाड्या, २७ दुकानासमोरील वाढीव भाग तोडण्यात आला. तलाव पाळी, एसटी डेपो, अशोक सिनेमा, प्रभात सिनेमा, जुनी महानगरपालिका, सुभाष पथ, जांभळी नाका व गडकरी रंगायतन आदी ठिकाणांच्या ३ हातगाड्या व २२ दुकानासमोरील वाढीव भाग तोडण्यात आला. यासोबतच कोपरीमधील नाखवा हायस्कूल, ठाणेकर वाडी, बारा बंगला, मंगला हायस्कूल तसेच रघुनाथ नगर, शाहिद मंगल पांडे सेवा रस्ता, आरटीओ ऑफिस व तीन हात नाका येथील ५ हातगाड्या व २३ दुकानासमोरील वाढीव भाग तोडण्यात आला
कळवा प्रभाग समितीमधील कळवा स्टेशन पूर्व, कळवा भाजी मार्केट, सहकार बाजार, कळवा नाका, खारेगाव मार्केट व पारसिक ९० फूट रोड परिसर या ठिकाणी असणाऱ्या फेरीवाल्यांवर कडक कारवाई करत त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. माजीवडा प्रभाग समिती क्षेत्रातील हायलँड रोड ते ढोकाळी नाका, शंकर मंदिर, मनोरमानगर येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर व पदपथावर असलेले फेरीवाले, अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण हटविण्यात आले. यामध्ये एकूण ८ लोखंडी टपऱ्या, १३ ताडपत्री शेड, १ पक्के शेड,२ हातगाड्या, १ लोखंडी गेट, निष्कासित करण्यात आले. तसेच माजीवडा प्रभाग समिती कार्यालय ते कळेशी रोड बाळकूम नाका व बाळकूम पाडा नं.१ येथील पदपथावर ठेवण्यात आलेले अनधिकृत स्टॉल, ५ टपऱ्या, १३ प्लस्टिक शेड आणि १ फूड स्टॉल तोडण्यात आला. दरम्यान दिवा प्रभाग समितीमधील स्टेशन रोड, दिवा आगासन रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले तसेच फुटपाथवरील अतिक्रमण हटवून अनधिकृत शेड तोडण्यात आले आहे.
सदरची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, संतोष वझरकर आणि अलका खैरे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.