टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : काँग्रेस सदस्य नाना पटोले यांनी आज विधानसभेत फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला. २०१६-१७ मध्ये राज्यातील आमदार खासदारांचे फोन टॅप करण्यात आले होते. समाजविघातक कृत्यांवर आळा घालण्याच्या नावाखाली हे फोन टॅपिंग करण्यात आले, यासाठी माझा फोन नंबर अमजद खान नावाने टॅप करण्यात आला. हे फोन टॅपिंग कोणाच्या आदेशावरून करण्यात आले ? यामागचा सुत्रधार कोण ? याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली.
अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे दाखवून माझा फोन टॅप करण्यात आला.नंबर माझा आणि अमजद खान असे मुस्लीम नाव ठेवण्यात आले.मुस्लीम धर्माचे नाव देऊन हिंदू मुस्लीम वाद निर्माण करुन राजकारण करायचे होते काय ? माझ्यासह इतर काही लोकप्रतिनिधींचे फोनही टॅप करण्यात आले. अशा प्रकारे लोकप्रतिनिधींचे फोन टॅप करणे ही सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. लोकप्रतिनिधींना सार्वजनिक जीवनातून बरबाद करण्याचे काम करण्याचा हा प्रयत्न आहे. सभागृहातच अनिल देशमुख करु, भुजबळ करू, अशा धमक्या दिला जात आहेत हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे असे पटोले यांनी सांगितले. केंद्रीय संस्था जर सदस्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम करत असतील तर त्याचाही परामर्श व त्याचीही काळजी व त्याबाबतीतील चौकशी गृहमंत्र्यांच्या माध्यमातून व्हावी तसेच विधिमंडळातील किती सदस्यांचे फोन टॅपिंगला ठेवले आहेत याची माहिती घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.अलीकडच्या काळात वर्तमानपत्रात आणि विरोधी पक्षातील लोकांकडून 'याला ईडी लावतो, त्याला सीबीआय लावतो' अशी विविध विधाने ऐकायला मिळतात. त्यामुळे विधानमंडळाचा सदस्य या नात्याने मंत्री म्हणून नव्हे या सभागृहातील अनेक सदस्यांना जर महाराष्ट्रापेक्षा वेगळी केंद्रीय एजन्सी फोन टॅपिंगवर ठेवत असेल तर अशाच आमच्या सभागृहातील सदस्यांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे असेही पाटील यांनी सभागृहात सांगितले .
यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, फोन टॅपिंग करणे हा गंभीर प्रकार असून अशा प्रकरणात रितसर परवानगी घेणे गरजेचे आहे परंतु तशी प्रक्रिया या प्रकरणात पार पाडल्याचे दिसत नाही.याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल.उद्याच या प्रकरणी उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माहितीही घेऊ असे वळसे पाटील यांनी सभागृहाला सांगितले.