जालियनवाला स्मारकाचा वाद

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

जालियनवाला स्मारकाचा वाद

पंजाबमध्ये जालियनवाला येथे जे स्वातंत्र्यापूर्वी १९१९ मध्ये जे भयानक संहारसत्र घडले आणि त्यात किमान एक हजार भारतीय नागरिकांना गोळ्या घालून  ठार करण्यात आले, त्या स्मारकाचे सुशोभिकरण करण्यात आले  आहे. मात्र यातून नवाच वाद निर्माण झाला आहे. ब्रिटिश अधिकारी जनरल  डायर याने बैसाखीसाठी जमलेल्या लोकांना विहिरीत कोंडून त्यांच्यावर बंदूक चालवली आणि चेंगराचेंगरी आणि गोळाबारात हजार लोक तर मारले गेले. त्यांचा अपराध काहीच नव्हता तर ते गरिब पंजाबी लोक होते. देशात संतापाचा आगडोंब उसळला. त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळून ब्रिटिशांचे जोखड मानगुटीवरून उतरायला तब्बल २८ वर्षे जावी लागली. त्या स्मारकाचे आता सुशोभिकरण मोदी सरकारने केले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या स्मारकाचे सुशोभिकरण म्हणजे शहिदांचा अपमान असे म्हटले आहे. स्मारकाचे सुशोभिकरण करताना त्यात लाईट अँड साऊंड शो ठेवला आहे. त्याला जास्त हरकत घेतली जात आहे. या  शोमुळे जालियनवाला घटनेचे गांभिर्य आणि भेदकता घालवली गेली आहे, असे आक्षेपकांचे म्हणणे आहे. त्यात तथ्य आहे. वास्तविक ही इतिहासाशी छेडछाड आहे. ज्या काही घटनांनी देशात स्वातंत्र्यसंग्रामात लोकांच्या मनांवर कठोर आणि खोलवर परिणाम झाले आणि त्यांनी ब्रिटिशांचे जोखड झुगारून देण्यासाठी कंबर कसली, त्यात जालियनवाला घटनेचे स्थान खूपच वरचे आहे. अशी भयानक घटना जेथे घडली तेथील जागा ही तशीच राहिली पाहिजे. मुळातच ती घटना इतकी भयानक होती आणि भारतीयांसाठी मनःस्ताप देणारी आहे की ती जागा नुसती पाहिली तरीही ब्रिटिशांविरोधात कुणाचेही मन पेटून उठेल. त्या जागेचे सुशोभिकरण करणे म्हणजे त्या जागेचे गांभिर्य घालवणे आहे. शिवाय स्मारकात आलेल्या लोकांचे लक्ष आता त्या लाईट अँड साऊंड शोकडेच जास्त वेधले जाणार आहे. शिवाय जालियनवाला घटनेच्या आठवणी ताज्या करणारा हा शो पहाताना लोक काहीबाही हातात घेऊन खात रहातील, पित रहातील. यात  ठार झालेल्यांबद्दल आदर कुठे राहिला. त्यामुळे मूळ घटनेबद्दल लोकांना फारसे काही वाटणारच नाहि. लोक स्मारकातील सोयी आणि तेथील खाण्यापिण्याच्या सुविधा यातच गुंग होतील आणि मग घटनेबद्दल कुणालाच काहीही वाटणार नाहि. क्रूरकर्मा जनरल डायरच्या कृत्यामुळे संताप येण्याऐवजी लोक निव्वळ हसतखिदळत स्मारक सोडतील. हा शहिदांचा अपमान निश्चितच आहे. राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर याप्रकरणी टिका केली आहे. त्यांच्या टिकेत जरूर तथ्य आहे. पण राहुल यांनी हेही लक्षात घ्यायला हवे की, काँग्रेसही काही धुतल्या तांदळासारखी नाहि. तिनेही अनेकदा शहिदांचा अपमान केलाच आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तर नाव उच्चारण्यासही काँग्रेसच्या काळात विशेषतः इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात बंदी होती. भगतसिंह आणि राजगुरू, सुखदेव यांचेही कित्येकदा अपमान केले गेले आहेत. अर्थातच त्यांच्या मरणोत्तर. तेव्हा राहुल गांधी यांनी मोदी सरकार शहिदांचा अपमान केला, म्हणून गळा काढताना आपल्या पक्षाने काय केले, याचेही स्मरण करावे. नाहि तर आपल्या आज्जींचे कर्तृत्व इतिहासात तपासून पहावे. पण याचा अर्थ मोदी सरकारने जे केले, ते समर्थनीय आहे, असे मुळीच नाहि. स्मारकाचे सुशोभिकरण ठीक आहे, पण लाईट आणि साऊंड शो म्हणजे खरोखरच शहिदांचा अपमान आहे. कारण त्या गोळीबारात जे हजारो लोक मरण पावले ते साधे बैसाखी सण साजरा करण्यास जमले होते. त्यांना एका विहिरीत कोंडून आणि त्यांचे सुटण्याचे सर्व मार्ग बंद करून जनरल रेजिनाल्ड डायरने आपल्या सैनिकांना त्यांच्यावर गोळीबार करण्याचा हुकूम दिला. कोणत्याही देशाच्या इतिहासात अशी नृशंस घटना सापडणार नाहि. त्या घटनेची अशी थट्टा उडवणे हे कोणत्याही सरकारला शोभत नाहि. पंजाबमध्ये पुढील वर्षी लवकरच निवडणुका होत आहेत. त्यापूर्वी पंजाबातील मतदारांना खुष करण्यासाठी मोदी सरकारने हे केले असले तरीही तो डाव भाजपच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण या प्रकारामुळे जनभावना तीव्र झाली आहे. काँग्रेसने भाजपवर याबाबतीत प्रखर टिका केली असली तरीही अचानक एक मित्र भाजपला मुख्यमंत्रि कॅप्टन अमरिंदर यांच्या  रूपात मिळाला आहे. अमरिंदर यांनी मात्र या सुशोभिकरण आणि शोचे कौतुक केले आहे. राहुल गांधी यांच्या अगदी विरोधात ही त्यांची लाईन आहे. त्यामुळे भाजपला काहीसा दिलासा मिळाला आहे. आता भाजप प्रखरपणे राहुल यांच्यावर हल्ले चढवू शकेल. राहुल यांच्यापेक्षा वेगळी लाईन घेताना अमरिंदर यांनी हा शो खूप चांगला आहे आणि आपल्याला आवडल्याचे म्हटले आहे. काँग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष असल्याचे तो वारंवार सांगत असल्याने आता अमरिंदर यांच्यावर कारवाई होते किंवा त्यांना समज दिली जाते का, हे पहावे लागेल. कारण काँग्रेसचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. अमरिंदर यांनी प्रथमच राहुल यांच्यापेक्षा विरूद्ध भूमिका घेतलेली नाहि. याअगोदरही त्यांनी  जम्मू आणि कश्मिर प्रकरणात भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता काँग्रेसची अमरिंदर यांच्यावर बारीक नजर राहिल. पण निवडणूक होईपर्यंत अमरिंदर यांना हटवण्याचे धाडस काँग्रेसचे होणार नाहि. कारण अमरिदंर यांच्यामुळेच पक्षाला गेल्या वेळेस विजय मिळाला होता. काँग्रेसचे खरे लोकशाहीप्रेम त्यानंतरच दिसेल.