खा. राजीव सातव यांच्या निधनाने तरुण, कर्तृत्ववान व उमदे नेतृत्व गमावले : नाना पटोले
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई: खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक तरुण, निष्ठावान, कर्तृत्ववान, अभ्यासू, प्रचंड क्षमता असलेला उमदा नेता गमावला असून काळाने माझा भाऊ हिरावून घेतला आहे. अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
खा. राजीव सातव यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करताना नाना पटोले म्हणाले की, राजीव सातव यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. काँग्रेस विचारांवार त्यांची प्रचंड श्रद्धा आणि निष्ठा होती. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, गुजरातचे प्रभारी म्हणून पक्षसंघटनेत त्यांनी मोलाचे योगदान दिले. अत्यंत मनमिळावून स्वभाव व कुशल संघटक असणा-या राजीव सातव यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून तरुणांची मोठी फळी राजकारणात उभी केली.
पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य म्हणून कार्यरत असताना त्यांनी कायम तळागाळातील कष्टकरी शेतकरी वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केले. केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरीविरोधी काळ्या कायद्यांना त्यांनी राज्यसभेत अत्यंत आक्रमकपणे विरोध करून शेतक-यांची बाजू लावून धरली होती. गुजरातचे प्रभारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी गुजरातमध्ये पक्षाची बांधणी करून काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळवून दिले होते. पक्षाने त्यांना दिलेली प्रत्येक जबाबदारी आपल्या कौशल्याने व कर्तृत्वाने त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. सोनियाजी व राहुलजी गांधी यांचे ते अत्यंत विश्वासू होते. राष्ट्रीय राजकारणातही आपल्या कामाने त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. खा. राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सातव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.