कोव्हॅक्सिन लस डेल्टा विषाणूवर ६५.२ टक्के परिणामकारक
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : भारत बायोटेक, आयसीएमआर व राष्ट्रीय विषाणू विज्ञान संशोधन संस्था यांनी तयार केलेली कोव्हॅक्सिन ही लस लक्षणे असलेल्या कोविड रुग्णांत ७७.८ टक्के परिणामकारक दिसून आली असून नवीन डेल्टा उपप्रकारावर ती ६५.२ टक्के परिणामकारक ठरली आहे.
कंपनीने शनिवारी म्हटले आहे, की कोव्हॅक्सिन लशीच्या परिणामकारकतेच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल जाहीर करण्यात आले असून त्यात आश्वासक परिणामकारकता दिसली आहे.
कोव्हॅक्सिन लस गंभीर करोना असलेल्या रुग्णात ९३.४ टक्के प्रभावी ठरली असून सुरक्षिततेतही सरस ठरली आहे. प्लासेबो म्हणजे औषधी गुण नसलेल्या गोळीसारखे म्हणजे सर्वात कमी दुष्परिणाम या लशीने दिसून आले आहेत. १२ टक्के लोकांमध्ये इतर परिणाम दिसून आले पण ते सौम्य होते, तर ०.५ टक्के लोकांमध्ये गंभीर प्रकारचे इतर परिणाम दिसून आले. लक्षणे नसलेल्या रुग्णात लस ६३.६ टक्के प्रभावी असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या १३० लक्षणहीन रुग्णांवर करण्यात आल्या. दोन आठवड्यात या चाचण्या भारतात २५ ठिकाणी घेण्यात आल्या होत्या. भारतातील चाचण्या व्यापक स्वरूपात झाल्या असून या लशीची परिणामकारकता व सुरक्षितता चांगली आहे, असे भारत बायोटेकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कृष्णा इल्ला यांनी सांगितले . भारतातील ही लस आता जागतिक पातळीवर उपलब्ध होत असल्याचा अभिमान वाटतो असे ते म्हणाले.
भारतीय वैद्यक संशोधन परिषदेचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले, की कोव्हॅक्सिन ही आयसीएमआर व भारत बायोटेक यांनी सार्वजनिक खासगी भागीदारीतून बनवलेली लस तिसऱ्या टप्प्यात ७७.८ टक्के प्रभावी ठरली आहे याचा आनंद वाटतो. भारत बायोटेक व आमच्या वैज्ञानिकांनी त्यासाठी मोठे परिश्रम घेतले होते. आंतरराष्ट्रीय दर्जा असलेली ही लस आहे.
‘फायझरची लस बिटापेक्षा डेल्टावर अधिक प्रभावी’
जोहान्सबर्ग : करोनाच्या बिटापेक्षा डेल्टा या उपप्रकारावर फायझर तसेच जॉन्सन अँड जॉन्सनची लस अधिक प्रभावी आहे, असे दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्यांच्या मते या लशी बिटा पेक्षा डेल्टा विषाणूवर जास्त प्रभावी आहेत. बिटा विषाणू उपप्रकार दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा दिसून आला होता, त्यानंतर डेल्टा हा उपप्रकार भारतात सर्वप्रथम आढळला होता. त्यामुळे नंतर दुसरी लाट येऊन अनेक ठिकाणी टाळेबंदी लागू करावी लागली.