अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात; मनसे कार्यकर्त्यांकडून ‘उद्धव ठाकरे हाय हाय’ची घोषणाबाजी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
राज्य सरकारने करोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही गोपाळकाल्याच्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर बंदी घातली. मात्र दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करण्याची भूमिका घेत ठाण्यामधील भगवती मैदानामध्ये आज सकाळपासून आंदोलन सुरु केलं. मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आंदोलन केलं जात असतानाच ठाणे पोलिसांनी अविनाश जाधव आणि ठाणे शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आलं तेव्हा उद्धव ठाकरे हाय हाय अशी घोषणाबाजी करण्यात आली.
आम्हाला दहीहंडी उत्सव नियमांचं पालन करुन साजरा करु द्यावा अशी मनसेचे मागणी आहे. यासाठी आज सकाळपासूनच भगवती मैदानावर मनसेने तयारी सुरु केली. या मैदानामध्ये स्टेज उभारण्यात येत होता. मात्र सकाळपासूनच पोलिसांनी या ठिकाणी पोलीसबंदोबस्त तैनात केला. सव्वा अकराच्या सुमारास येथे पोलिसांच्या मोबाईल व्हॅन्स दाखल झाल्या आणि त्यानंतर जाधव यांच्यासहीत पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी राज ठाकरेंचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या तसेच उद्धव ठाकरेंविरोधातही घोषणाबाजी झाली.
शिवसेनेची गर्दी चालते मग सणांना विरोध का?
जुहूमधील नारायण राणेंच्या घरासमोर शेकडो शिवसैनिक जमले ते चालतं. यांचा (मुख्यमंत्र्यांचा) भाचा शेकडो लोकांना घेऊन आंदोलन करतो ते चालतं. काल नारायण राणे कुडाळमध्ये पोहचले तेव्हा शिवसेनेच्या शाखेसमोर शे-दीडशे लोक होते ते चालतं. मात्र हिंदूंचे सण म्हटल्यावर करोनाचं कारण दिलं जातं. याचं राजकारण करताना करोना आडवा येत नाही. असा कोणता करोना आहे जो उद्धव ठाकरेंच्या लोकांना होत नाही पण हिंदू सणांमध्ये पसरतो?, असा प्रश्न प्रसारमाध्यमांशी बोलताना जाधव यांनी उपस्थित केलाय. राज्य सरकारच्या निर्णयानंतर ठाण्यातील शिवसेनेच्या नेत्यांमार्फत आयोजित केले जाणारे दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आले. मात्र, मनसेने दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असून नियम पाळून हा उत्सव साजरा करणार असल्याचा दावा केला आहे.
पाच हजार जमतात तिथे ५० जणांनाही बंदी घालत असाल तर…
पोलीस त्यांचं काम करत असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घेत असल्याचंही जाधव यांनी म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी दहीहंडी साजरी करण्यासंदर्भात आपण ठाम असल्याचं ते म्हणाले आहेत. या मैदानात एका वेळी पाच हजार लोक जमतात. इथे जर तुम्ही ५० लोकांनाही जमा होण्यास बंदी घालत असाल तर हे चुकीचं आहे, असंही जाधव यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारच्या आदेशांची अंमलबजावणी करत दहीहंडी उत्सवादरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे यंदाच्या दहीहंडी उत्सवादरम्यान ठाण्यात आयोजक विरुद्ध पोलीस असा संघर्ष वाजण्याची चिन्हे आहेत.