करोनाशी लढण्यासाठी लिली अँटिबॉडी कॉकटेलला केंद्राची मान्यता!
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला जोरदार तडाखा बसलेला असताना लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे हा लढा अधिकाधिक कठीण होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी रॉश इंडियाच्या कॉकटेल अँटिबॉडी इंजेक्शनला आपातकालीन वापर म्हणून भारतात मान्यता दिल्यानंतर आता अजून एका कॉकटेल अँटिबॉडी इंजेक्शनला मान्यता देण्यात आली आहे. अमेरिरकन औषध निर्माता कंपनी असलेल्या एलि लिली अँड कंपनीच्या अँटिबॉडी कॉकटेल इंजेक्शनचा भारतातील मध्यम आणि सामान्य तीव्रतेच्या करोना रुग्णांसाठी वापर करण्याला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे करोनाशी सुरू असलेल्या भारताच्या लढ्यामध्ये अजून एक औषध आरोग्य यंत्रणेच्या मदतीसाठी आलं आहे.
शरीरात प्रवेश केलेल्या करोनाचा खात्मा करण्यासाठी अद्याप कोणतंही औषध बनवण्यात आलेलं नाही. मात्र, करोनाच्या विषाणूंचा सामना करणाऱ्या अँटिबॉडी शरीरात तयार करण्याची प्रक्रिया सुरू किंवा वेगवान करण्यासाठी काही औषधांचा वापर केला जात आहे. रॉश इंडियाच्या कॉकटेल अँटिबॉडीजप्रमाणेच लिली कंपनीच्या कॉकटेल अँटिबॉडीजमुळे देखील काहीसा असाच परिणाम साधला जाणार आहे.
नेमकं हे औषध काय करणार?
रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार, लिली कंपनीच्या मोनोक्लोनल अँटिबॉडी इंजेक्शनमध्ये बॅमलॅनिविमॅब आणि इटेसेविमॅब या दोन प्रकारच्या अँटिबॉडी इंजेक्शनचं मिश्रण करून डोस तयार करण्यात आला आहे. या प्रकारच्या मोनोक्लोनल अँटिबॉडीज करोनाच्या विषाणूचा सामना करण्यासाठी शरीरात नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या अँटिबॉडीजची नक्कल तयार करतात. त्यामुळे शरीराला करोनाच्या विषाणूंचा सामना करण्यासाठी मदत मिळू शकते.
कसं आहे रॉश अँटिबॉडी कॉकटेल?
रॉश इंडिया या औषध निर्मिती कंपनीने ही दोन्ही अँटिबॉडी असलेली इंजेक्शन्स बनवली आहेत. गेल्या वर्षी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर करोना उपचारांसाठी ही पद्धत वापरण्यात आली होती. कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, “दोन्ही इंजेक्शनच्या कॉकटेल पॅकिंगमध्ये कासिरिविमॅब (Casirivimab) आणि इमडेविमॅब (Imdevimab) यांचे प्रत्येकी ६०० मिलीग्रॅमचे डोस आहेत. या प्रत्येक डोसची किंमत ५९ हजार ७५० रुपये इतकी आहे. या एका कॉकटेल पॅकिंगमधून दोन रुग्णांना डोस देता येऊ शकतील. एका कॉकटेल पॅकिंगची कमाल किंमत १ लाख १९ हजार ५०० इतकी आहे.”