आशिष मिश्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
लखनऊ, : उत्तरप्रदेशातील लखीमपूर-खिरी येथील हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा मुलगा आशिष मिश्रा याला शनिवारी अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी हत्याकांडातील आरोपी आशिष मिश्रा शनिवारी 9 ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखेसमोर चौकशीसाठी हजर झाला. यापूर्वी, आशिष मिश्राला शुक्रवारी सकाळी 10 वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. परंतु, आरोपीने वेळ मागितल्यानंतर त्याला शनिवारी सकाळी 11 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपायच्या अर्धा तास अगोदर सकाळी 10.38 वाजता आशिष मिश्रा क्राईम ब्रान्चच्या कार्यालयात दाखल झाला. आशिष मिश्रा यांच्यावर चार शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडण्याचा आरोप आहे. दिवसभर चाललेल्या चौकशीनंतर आशिष मिश्रा याला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. त्यानंतर आशिष याला शनिवारी रात्री उशिरा न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला 3 ऑक्टोबरला लखीमपूर हिंसाचारासंदर्भात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या हिंसाचारात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणासंदर्भात सुमारे 12 तासांच्या चौकशीनंतर वैद्यकीय पथकाने गुन्हे शाखा कार्यालयात आशिष मिश्राची तपासणी केली. यानंतर त्याला न्यायदंडाधिकाऱ्यां समोर हजर करण्यासाठी नेण्यात आले. दंडाधिकाऱ्यांनी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यासंदर्भात फिर्यादी अधिकारी एसपी यादव यांनी माहिती दिली. आशिष मिश्राच्या पोलीस रिमांडसाठी अर्ज न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. त्यामार्फत 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता सुनावणी निश्चित करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या 3 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या चार शेतकऱ्यांना मारणाऱ्या वाहनांपैकी एका वाहनात अशिष मिश्रा असल्याचा आरोप होत आहे.