आमची वायफळ बडबड, मग यांची मुक्ताफळं कोणतं प्रबोधन करतात? – प्रविण दरेकर
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मंबई : एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली असताना त्यावर राज्यात उलट-सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दिल्लीत मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची बैठक सुरू होताच भाजपाकडून व्यक्त केल्या जाणाऱ्या प्रतिक्रियांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपावर निशाणा साधला होता. “भाजपाकडे बडबड आणि वायफळ विधाने यापेक्षा दुसरं काही त्यांच्याकडे शिल्लक नाही”, असं मिटकरी म्हणाले होते. त्यावर आता विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी निशाणा साधला आहे. “आम्ही बोललो की वायफळ बडबड? यांनी उधळलेली मुक्ताफळं कोणतं प्रबोधन करतात अमोल मिटकरी?” असा प्रश्न प्रविण दरेकरांनी केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगताना दिसू लागला आहे.
थकणं भाजपाच्या रक्तातच नाही!
प्रविण दरेकरांनी आपल्या ट्विटर हँडलवर ट्वीट करून अमोल मिटकरींना प्रत्युत्तर दिलं आहे. “आम्ही बोललो की वायफळ बडबड? यांनी उधळलेली मुक्ताफळं कोणतं प्रबोधन करतात अमोल मिटकरी? भाजपाची ऊर्जा अक्षय आहे आणि ती कार्यकर्त्यांच्या कष्टातून मिळवलेली आहे. थकणं भाजपाच्या रक्तातच नाही! महाविकासआघाडीच्या प्रत्येक निर्णयातून मानसिक दिवाळखोरी दिसतेच आहे”, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
भाजपा मानसिकदृष्ट्या थकलेला पक्ष!
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी ट्विटरवरूनच प्रविण दरेकर आणि भाजपाला खोचक टोमणा मारला होता. “अजून बैठकीला सुरुवात पण झाली नाही आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविणजी दरेकर महाराष्ट्र महाविकासआघाडी सरकारवर बोलायला लागले. अर्थ स्पष्ट आहे. भाजपा मानसिकदृष्ट्या थकलेला पक्ष झालाय. बडबड आणि वायफळ विधाने यापेक्षा दुसरं त्यांच्याकडे काही शिल्लक नाही”, असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं होतं. त्यावर प्रविण दरेकरांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे आता हा राजकीय कलगीतुरा चांगलाच रंगण्याची चिन्हं आहेत.