अत्यावश्यक सेवा कर्मचारीच बेफिकीर
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : अत्यावश्यक सेवा कर्मचारीही लोकल प्रवासात मुखपट्टीचा वापर करत नसल्याचे समोर आले आहे. मुखपट्टी न वापरणाऱ्या रेल्वे प्रवाशांवर तिकीट तपासनीस दंडात्मक कारवाई करत असून आता नियमभंग करणाऱ्या प्रवाशांना मोफत मुखपट्टी देऊन जनजागृती करण्याची मोहीम मध्य रेल्वेने हाती घेतली आहे. त्यानुसार दोन दिवसांत मुखपट्टीचा वापर न केलेल्या १०० प्रवाशांना मुखपट्टीचे वाटप करण्यात आले.
करोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी मुखपट्टीचा वापर करणे बंधनकारक आहे. लोकल प्रवासातही प्रवाशाने मुखपट्टीचा वापर करण्याचे आदेश राज्य शासन, पालिका व रेल्वेने दिले आहेत. तरीही अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची परवानगी आहे. मात्र हे कर्मचारीही नियमपालनाबाबत गंभीर नसल्याचे दिसत आहे. लोकल प्रवासात, फलाट किंवा पादचारी पुलांवरून चालताना मुखपट्टी हनुवटीवर ठेवणे किंवा नाकापर्यंत मुखपट्टी न घालता फक्त तोंड झाकून ठेवणे किंवा मुखपट्टी खिशात ठेवणे असे प्रकार प्रवासी करतात. अशा प्रवाशांवर पालिकेच्या मार्शलकडून रेल्वे हद्दीत कारवाई केली जाते. ही कारवाई अधिक तीव्र व्हावी या उद्देशाने रेल्वेलाही दंडात्मक कारवाईचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार १७ एप्रिलपासून रेल्वेकडून कारवाईला सुरुवात झाली. आतापर्यंत मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गावर मुखपट्टीचा वापर न करणाऱ्या ४८९ प्रवाशांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून एकूण १ लाख ६ हजार ७६५ दंड वसूल केला आहे. परंतु या कारवाईनंतरही मुखपट्टी न लावणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे मध्य रेल्वेने मुखपट्टी न वापरणाऱ्या प्रवाशांनाच मास्क देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून अशा प्रवाशांना आपली चूक समजेल, अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. गेल्या दोन दिवसांत सीएसएमटी, कुर्ला, घाटकोपर, दादर, ठाणे यांसह अन्य महत्त्वाच्या ठिकाणी १०० प्रवाशांना मुखपट्टय़ा देण्यात आल्या आहेत.