राज्यांवर खापर फोडण्यापेक्षा केंद्राने अखंडित लस पुरवठा करावा – राजेश टोपे
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : लसीकरणाबाबत महाराष्ट्र सातत्याने देशात प्रथम क्रमांकावर आहे. केंद्र सरकारने अखंडित लस पुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडावी. नियोजनासाठी महाराष्ट्र शंभर टक्के सज्ज असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
केंद्र सरकारकडून राज्यांना वेळेत लस मिळत नसल्यामुळे अनेक राज्यांनी केंद्राच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. यावर नियमित लसपुरवठ्याची हमी देण्याऐवजी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी राज्यांवरच खापर फोडत राज्यांनी योग्य लस नियोजन करावे असे सांगितले. केंद्राकडून राज्यांना वेळोवेळी लसपुरवठ्याची पूर्वसूचना दिली जात असून त्यानंतर काही समस्या आल्यास त्याची जबाबदारी पूर्णतः राज्यांची असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यांनी लसीकरणाचे योग्य नियोजन व आखणी केली पाहिजे असे सांगून योग्य आखणी करता येत नसेल तर त्याला केंद्र नव्हे तर राज्य सरकार जबाबदार असल्याची टीका हर्षवर्धन यांनी टि्वटरवर केली आहे. तसेच लसपुरवठ्यासंदर्भात वस्तुस्थिती जाणून न घेता नेत्यांकडून होणारी टीका दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लसीकरण समस्या दूर करण्यासाठी राज्यांतर्गत लसपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचेही हर्षवर्धन यांनी सांगितले.
केंद्राकडून राज्याला वेळोवेळी लसपुरवठ्याची पूर्वकल्पना दिली जाते हे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे विधान चुकीचे असून गेल्या पंधरा दिवसात केंद्राकडून लसपुरवठ्याचा केवळ अंदाज दिला जात असल्याचे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. राज्याच्या मागणीनुसार केंद्राकडून लस मिळत नाही तर केंद्राकडील उपलब्धतेनुसार लस दिली जाते. नेमकी किती लस उपलब्ध आहे ते केंद्रालाच माहिती असते. त्याची कल्पना राज्यांना नसते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून म्हणजे लसपुरवठ्याबाबत राज्यांनी ओरड सुरू केल्यानंतर केंद्राकडून किती साठा मिळणार याचा अंदाज देण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.