“भाजपा कोणावर तरी दबाब आणण्याचा प्रयत्न करतंय”, संजय राऊतांचा गंभीर आरोप
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
शिवसेना खासदार संजय राऊत आज गोवा दौऱ्यावर निघाले आहेत. शिवसेना गोव्यातून निवडणूक लढवणार असल्याने तिकडे आपण चाललो असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. बाळासाहेब ठाकरेही तिकडे प्रचारासाठी गेले होते. आम्ही जिंकलो जरी नसलो तरी तिकडे आमचे संघटन आहे, असंही राऊत यावेळी म्हणाले. त्याचबरोबर भाजपा कोणावर तरी दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही राऊत यांनी यावेळी बोलताना केला.
आज माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, “उद्धवजींच्या सांगण्याप्रमाणे मी आता गोव्याला निघालो आहे. आम्ही तिकडे २२ जागांवर लढू. आज संपूर्ण गोव्याला अंमली पदार्थांचा विळखा पडलेला आहे. गोव्यात कॅसिनोचा, जुगाराचा कहर आहे. त्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करतच भाजपा तिकडे सत्तेवर आली. मात्र आज त्या सगळ्याला भाजपाचाच पाठिंबा आहे. करोनाकाळात गोव्याची अवस्था वाईट झाली आहे. ड्रग्समाफियांच्या ताब्यात गोवा अडकला आहे. भाजपा फारच थापा मारत आहे. त्यासाठी तिकडे जाणं गरजेचं आहे”.
ते पुढे म्हणाले, “आम्ही महाराष्ट्रात कोणताही पक्ष फोडला नाही. आज भारतीय जनता पक्ष कोणाला तरी फोडायचा प्रयत्न करत आहे. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून ते कोणावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि गोव्याची तुलना करता येणार नाही. भाजपाने गोव्यात अनेकदा तोडफोड करत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची इच्छा जनतेची आहे आणि ते शिवसेनाच करु शकते. आमचं गोव्यात प्राबल्य आहे. कोणासोबत युती किंवा आघाडी झाली तर ठीक, नाहीतर आमचं आम्ही लढू”.