ब्रँड वॉरची मजेदार कथा
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
कंपनीसाठी ब्रँड किती महत्वाचा असतो, हे सांगायची जरूर नाहि. कंपनीचे बरेचसे यश हे तिच्या ब्रँडवर अवलंबून असते. कित्येकदा तर उत्पादनाकडे ग्राहक पहातही नाहित. थेट ओळखीचा ब्रँड दिसला की वस्तु उचलतात. घासाघीस करतात किंवा करत नाहित, पण त्याच ब्रँडची तीच वस्तु घेऊन जातात. ब्रँडवरून ग्राहकांची पसंती ठरते आणि कंपनीला त्याचा फायदा होतो. यालाच गुडविल असेही म्हणतात. एखाद्या कंपनीचे एखादे उत्पादन लोकप्रिय झाले की लगेचच त्याच्या निकृष्ट दर्जाच्या आणि घटिया आवृत्या बाजारात येऊ लागतात. ब्रँडची नक्कल तंतोतंत केली असल्याने लोकांना गडब़डीत ओळखू येत नाहि. त्यातूनच मग ग्राहकांची फसवणूक होते. यामुळे नुकसान ग्राहक आणि कंपनी दोघांचेही होते. मग कंपन्या खटले दाखल करतात किंवा आमची कुठेही शाखा नाहि, वगैरे घोषणापत्र छापतात. ब्रँड हा विषय इतका महत्वाचा आहे की या ब्रँडवरून सध्या केरळ आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये आपापल्या परिवहन सेवेच्या नावावरून युद्ध पेटले आहे. दोन्ही राज्यांची नावे के या अक्षरापासून सुरू होत असल्याने दोघांनीही केएसआरटीसी म्हणजे केरळ राज्य परिवहन महामंडळ आणि कर्नाटक राज्य परिवहन महामंडळ या लघुरूपावर दावा सांगितला आहे. दोन हजार बारापासून या दोन राज्यांमध्ये ही कायदेशीर लढाई सुरू होती. त्यावर आता केरळने आम्हीच ही लढाई जिंकली असल्याचा दावा केला आहे. त्याचीच ही मनोरंजक कथा आहे. ब्रँडसाठी युद्धे होतात ती अर्थातच त्यात असलेल्या व्यापारी
हितसंबंधांमुळेच, यात काही आश्चर्य नाहि. कर्नाटक आणि केरळ राज्यांमध्ये केएसआरटीसीला प्रचंड मागणी आहे. दोन्ही मंडळांची सेवा अतिशय वक्तशीर, किफायतशीर आणि प्रवाशांच्या पसंतीची आहे. त्यामुळेच ब्रँडमुळे होणारा आर्थिक फायदा दोन्ही सरकारांन खुणावत आहे. खासगी प्रवासी बसेसने बहुतेक राज्य परिवहन महामंडळांचा व्यवसाय डबघाईला आणला असला तरीही केएसआरटीसीची आर्थिक कमाई इतर राज्यांमधील सरकारी परिवहन सेवेपेक्षा चांगलीच भरभराटीला आली आहे. कोरोनाचा काळ सोडला तर दोन्ही महामंडळांनी चांगला व्यवसाय केला आहे. परंतु दोघांच्याही ब्रँडचे लघुरूप एकच असल्यामुळे सारा कायदेशीर झगडा उभा राहिला आहे. दोन हजार बारामध्ये कर्नाटकने पेटंटस, डिझाईन्स आणि ट्रेडमार्क महालेखापालांकडे केएसआरटीसी ट्रेडमार्क वापरण्याचे अधिकार आपल्यालाच रहातील, असा दावा करत केरळला हा लोगो वापरू नका, अशी तंबी दिली. केरळने त्याला विरोध केला आणि हे प्रकरण दोन हजार चौदामध्ये चेन्नईच्या ट्रेड मार्क नोंदणी कार्यालयात गेले. दोन्ही सरकारांनी अस्मितांचे राजकारण खेळत आपापल्या दाव्यांच्या पुष्ट्यर्थ पुरावे सादर केले. त्यात मल्याळी आणि कन्नड या भाषक अस्मितांचाच भाग जास्त होता. आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे केरळच्या मदतीला धावून आला तो एकोणीसशे एकोणसत्तर साली बनवण्यात आलेला एक मल्याळी चित्रपट. त्यात केएसआरसीटी असा ट्रेडमार्क असलेली बस दाखवण्यात आली होती. केरळने यावरून आम्ही
किती आधीपासून हा लोगो वापरत होतो, याचा पुरावाच दिला. कन्नूर डिलक्स असे त्या चित्रपटाचे नाव असून कन्नूर ते थिरूवनंतपुरम दरम्यान धावणार्या एका नियमित जलद बसवर तो चित्रपट आधारित होता. मल्याळी लोकप्रिय अभिनेता प्रेम नजीर आणि शीला या दोघांना या बसमधून प्रवास करताना दाखवले होते. आणि लोगोमध्ये दोन हत्ती आपली सोंड उंचावून असल्याचे चित्र होते. केरळने असाही दावा केला आहे की, आमचे राज्य परिवहन मंडळ एकोणीसशे पासष्टमध्ये स्थापन झाले आहे. तर एकोणीसशे चौर्याहत्तरमध्ये म्हैसूर सरकारच्या राज्य परिवहन मंडळाचे केएसआरटीसी असे नामकरण करण्यात आले. या ब्रँड युद्धात अर्थातच व्यापारी हित आणि लाभ हेच केंद्रस्थानी आहेत. दोन्ही परिवहन मंडळांची लोकप्रियता इतकी आहे की प्रवासी दुसर्या बस सेवेचा विचारही करत नाहि. दोन्ही मंडळांचे गुडविल हे प्रचंड आहे आणि गुडविल हे एक प्रकारे भांडवलच असते. हे गुडविल दोन्ही राज्ये आपल्या हातातून जाऊ देऊ इच्छित नाहित, हे बरोबरच आहे. मात्र ब्रँड म्हणजे केवळ लोगो आणि त्यावरील घोषवाक्य नसते. तर त्यामागे वर्षानुवर्षाची मेहनत, ग्राहक आकर्षित करण्यासाठी केलेले कष्ट, लढवलेल्या कल्पना यांचा तो समुच्चय असतो. असे गुडविल तयार होण्यासाठी वर्षे लागतात. तर त्याचा सत्यानाश होण्यासाठी एक घटनाही पुरेशी होते. त्यामुळेच कंपन्या आपल्या गुडविल आणि ब्रँड हातून जाऊ नये, यासाठी प्रचंड दक्ष आणि संवेदनशील असतात. केरळने असा दावा केला आहे की, महालेखापालांनी केरळचा दावा मान्य केला असून कर्नाटकला तो लोगो वापरण्यास मनाई केली आहे. यावर अर्थातच कर्नाटक संतप्त आहे. कर्नाटकने आम्ही यावर अभ्यास करू आणि पुढे काय कारवाई करायची, ते ठरवू, असे म्हटले आहे. मात्र ही मनोरंजक लढाई येथेच थांबलेली नाहि, एवढे मात्र निश्चित झाले आहे.