परमबीर सिंह यांना ९ जूनपर्यंत अटक नाही, सरकारचे न्यायालयात आश्वासन
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना ९ जूनपर्यंत ॲट्रॉसिटी प्रकरणात अटक केली जाणार नाही, असे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आले. न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या सुट्टीकालीन न्यायालयात सोमवारी ऑनलाईन सुनावणी पार पडली. दरम्यान या कालावधीत परमबीर सिंह यांनी तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंतीही राज्य सरकारने खंडपीठासमोर केली.
नियमित कामकाजात होणार सुनावणी
या प्रकरणावर आता सुनावणी घेण्याऐवजी दोन आठवड्यांनी सुरू होणाऱ्या नियमित कामकाजात सुनावणी घेऊ, असा सल्ला दिल्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं विशेष सरकारी वकील दरायस खंबाटा यांनी उपरोक्त आश्वासन दिले. मात्र या कालावधीत याचिकाकर्ते परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयातून या प्रकरणाशी संबंधित याचिका मागे घ्यावी, कारण एका प्रकरणात एकाच वेळी दोन ठिकाणी दिलासा मागता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. ही बाब मान्य करत परमबीर सिंह यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयातून या संदर्भातील याचिका मागे घेण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे.