पुणे - कोरोना प्रतिबंधक लस घेऊनही १८ जणांना डेल्टा प्लसची लागण
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
पुणे : राज्यात ६६ डेल्टा प्लस रुग्णांची नोंद झाली आहे. डेल्टा प्लसच्या ६६ रुग्णांपैकी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या १८ जणांना डेल्टा प्लसची लागण झाली आहे. १८ पैकी १० जणांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, तर ८ जणांनी लसीचा एकच डोस घेतला आहे. लसीकरण झालेल्यांपैकी २ व्यक्तींनी कोव्हॅक्सिन तर इतर १६ जणांनी कोविशिल्ड या लसीचे डोस घेतले होते.एकूण रुग्णांपैकी ३२ पुरुष असून ३४ स्त्रिया आहेत. सर्वाधिक ३३ डेल्टा प्लस रुग्ण १९ ते ४५ वयोगटातील आहेत, तर त्याखालोखाल ४६ ते ६० वयोगटातील १८ रुग्ण आहेत. यामध्ये १८ वर्षांखालील ७ बालके असून, ६० वर्षांवरील ८ रुग्ण आहेत. ६६ पैकी ३१ रुग्ण लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले आहेत. यामुळे त्यांच्यावर घरातच उपचार सुरू आहेत. एकूण रुग्णांपैकी अर्ध्याहून अधिक म्हणजे ३६ रुग्ण हे जळगाव, रत्नागिरी, मुंबई या तीन जिल्ह्यांत आढळून आले आहेत.विषाणूने आपली जनुकीय रचना बदलत राहणे, हा विषाणूच्या नैसर्गिक जीवनक्रमाचा भाग असून या संदर्भात जनतेने कोणतीही भीती न बाळगता कोविड अनुरूप वर्तनाचा अंगीकार करणे गरजेचे आहे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.