टीम इंडियाचे प्रशिक्षकपद हा काटेरी मुकुट; अपयशानंतर प्रचंड टीका : शास्त्री
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
लंडन : भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद हे काटेरी मुकुटासारखे आहे. इंग्लंड आणि ब्राझीलच्या फुटबाॅल संघातील काेचप्रमाणेच या प्रशिक्षकाला आपली जबाबदारी चाेखपणे पार पाडावी लागते. पराभव आणि अपयशानंतर प्रचंड जिव्हारी लागणाऱ्या टीकेचाही वेळप्रसंगी सामना करावा लागताे. भारतामध्ये या पदाला काेणताही शाॅर्टकट नाही. ही भूमिका यशस्वीपणे पार पाडण्याची माेठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर असते, अशा शब्दांत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपली प्रतिक्रिया दिली. सध्या टीम इंडियाचे प्रशिक्षक बदलाची माेठी चर्चा आहे. यातून ५९ वर्षीय शास्त्री हे टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षकपद साेडून देणार आहेत.
‘भारतीय संघाचे प्रशिक्षकपद ही फार आव्हानात्मक भूमिका आहे. कारण, तुम्ही सातत्याने चाहत्यांच्या निशाण्यावर असता. एखादे अपयशही चाहत्यांना दुखावणारे असते. त्यामुळे त्यांच्याकडून तुमच्यावर प्रचंड टीका हाेते. सहा महिने सातत्यपूर्ण चांगल्या कामगिरीनंतर भारतीय संघाचा कसाेटीत अवघ्या ३६ धावांवर धुव्वा उडाला. यादरम्यान चाहत्यांनी प्रचंड टीका केली. मात्र, मी याकडे दुर्लक्ष केेले. कारण आता टी-२० विश्वचषकानंतर मी या जबाबदारीतून मुक्त हाेणार आहे. मात्र, मला यातून बरेच काही शिकण्यास मिळाले. आता या जबाबदारीतून मुक्त हाेण्याची वेळ जवळ आली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सध्या रवी शास्त्री यांच्यानंतर टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी काेणाकडे साेपवण्यात येईल, यावर जाेरदार चर्चा सुरू आहे. यासाठी अनेकांची नावेही समाेर येत आहेत. यामध्ये सध्या माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय यासाठी विदेशी काेचही शर्यतीत आहेत.