सुशांत मृत्यु प्रकरण अधांतरीच
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
एखाद्या अभिनेत्याच्या कथित खून की आत्महत्या प्रकरणाभोवती अख्ख्या देशाचे राजकारण फिरावे आणि त्यात सारेच राजकीय पक्ष अगदी ताळतंत्र सोडल्यासारखे सामिल व्हावेत, हे दर्जेदार अभिनेता सुशातंसिंह राजपूत मृत्यु प्रकरणाने देशाने पाहिले. आज सुशांतच्या मृत्यु प्रकरणाला संपूर्ण वर्ष लोटले आहे. परंतु गाजावाजा करून या प्रकरणाची चौकशी करण्य़ासाठी नेमलेल्या सीबीआय अद्यापही कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहचलेली नाहि. सीबीआयकडे हे प्रकरण तपासासाठी सोपवण्यात आल्यानंतर यातून भलतेच राजकारण रंगले आणि भाजप विरूद्ध शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अशी यथेच्छ चिखलफेक रंगली. सार्याच पक्षांनी या होळीत एकमेकांवर रंग उडवून घेतले आणि नंतर जणू काहीच घडले नाहि, अशा थाटात आता सारेजण साळसूदपणे शांत आहेत. सुशांत बिहारचा असल्याने बिहारच्या निवडणुकीत त्याच्या मृत्युचा यथास्थित वापर करण्यात आला आणि त्यात भाजप आणि जेडीयूने सत्ताही प्राप्त केली, असा विरोधकांचा आरोप आहे. बिहार निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने महाराष्ट्र सरकारला बदनाम केले, असा आरोप आज राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. याचा अर्थ मृत्युनंतर वर्ष उलटूनही अजूनही सुशांतची या पक्षीय राजकारणातून सुटका झालेली नाहि. आता मलिक यांना उत्तर देण्यासाठी भाजपचे नेते पुढे येतील आणि पुन्हा राष्ट्रवादीचे नेते त्यांना उत्तर देतील आणि हे प्रकरण असेच रंगत राहिल. सुशांतच्या मृत्युनंतर सीबीआय चौकशीचे नाट्य घडले आणि आता एक वर्षांनंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. एका इंग्लिश आणि हिंदी वृत्तवाहिनीने सुशांत मृत्यु प्रकरण हे मिशन बनवले आणि नंतर त्या वाहिनीचे सर्वेसर्वा आणि प्रसिद्ध पत्रकार अर्णब गोस्वामी यांना महाराष्ट्र सरकारने जुने प्रकरण काढून अटकही केली होती. महाविकास आघाडी सरकारचेही वर्तन भाजपइतकेच किंबहुना जास्तच बालिशपणे होते. अर्णब गोस्वामी किंवा अभिनेत्री कंगना रणावत यांच्यावर लगेचच महापालिकेने कारवाई करून राज्य सरकार किती बालिशपणे वागू शकते, याचे प्रत्यंतर आणून दिले. त्यात शिवसेनेचा एक नेता तर जणू हे वैयक्तिक सूडाचा प्रकार असल्यासारखे वर्तन करत होता. हे सर्व कोरोनाची लाट जोरात असताना होते. याचा अर्थ भाजप असो की महाविकासमधील पक्ष, यांची प्राधान्ये कोरोना आटोक्यात आणणे नसून एका अभिनेत्याच्या मृत्युप्रकरणी एकमेकांवर राजकीय कुरघोडी करणे हेच होते. असे पक्ष ज्या देशात असतील, त्या देशाला कुणीही वाचवू शकत नाहि. दरम्यान, गोस्वामीला अटक करणारे मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे स्वतःच अडचणीत आले आणि आता त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. तर ज्या गोस्वामीला मुद्दाम अलिबागहून अटक करण्यासाठी सचिन वाझे नावाच्या अधिकार्याची नियुक्ती करण्यात आली होती, तो अधिकारी आज तळोजा तुरूंगात अटकेत आहे. कारण त्याच्यावर अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकानी भरलेली गाडी लावणे आणि मनसुख हिरानी या व्यापार्याच्या हत्येचा आरोप आहे. गोस्वामी यांना मुद्दाम जुने प्रकरण काढून अटकेचा आदेश देणारे माजी गृहमंत्रि अनिल देशमुख हे स्वतःच चौकशीच्या फेर्यात सापडले आहेत. इतक्या विचित्र घटना घडल्या आहेत. तरीही सुशांतचा मृत्यु नेमका कशामुळे झाला आणि त्याची हत्या झाली असेल तर त्यामागे कोण सूत्रधार होते, हे अद्याप बाहेर आलेलेच नाहि. सीबीआय याबाबतीत मूग गिळून आहे. दरम्यान सीबीआयने अनेक सेलेब्रिटींची चौकशीही अमली पदार्थांच्या अनुषंगाने केली. त्याबाबतीतही पुढे काहीच झालेले नाहि. गोस्वामींना त्रास देणारे अधिकारी स्वतःच चौकशीच्या फेर्यात सापडले आणि अनिल देशमुख यांना तर मंत्रिपद गमवावे लागले. परंतु यात सुशांतला अजूनही न्याय मिळालाच नाहि. आता सुशांतचे पाठीराखे मेणबत्या लावून मोर्चे वगैरे काढतील. परंतु या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर सीबीआयने लावून आपले निष्कर्ष जाहिर करावेत, ही मागणी सर्वांनी करायला हवी. एका शिवसेनेच्या मंत्र्याचे नावही या प्रकरणात घेतले जात होते. त्याबाबतीतही केवळ संशयाच्या भोवर्यात राहून उपयोगाचे नाहि. एकतर सीबीआयने त्याला क्लिन चिट द्यायला हवे अथवा आपले निष्कर्ष प्रसिद्ध करायला हवेत. हे प्रकरण असेच लटकत ठेवले तर उगीचच संशय निर्माण होतो आणि साराच गोंधळ माजतो. तसे तर अनेक प्रकरणे अद्यापही सुटलेली नाहित. नंतर काळानेच आरोपींचा मृत्यु घडवून आणून ही प्रकरणे संपवली आहेत. बोफोर्स प्रकरणी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी खरोखर दलाली घेतली का, याचा तपास आजही लागलेला नाहि. त्या अगोदरच राजीव यांची हत्या झाली आणि त्यातील हवाच निघून गेली. अयोध्येतील बाबरी मशिद नेमकी कुणी पाडली, याचाही तपास लागलेला नाहि. अशाच अनेक प्रकरणांमध्ये आता सुशांत मृत्यु प्रकरणाची भर पडली आहे. एका अभिनेत्याच्या संशयास्पद मृत्युमुळे देशाचे राजकारण ढवळून निघावे, असे हे पहिलेच प्रकरण आहे. कित्येक अभिनेते आणि अभिनेत्रींनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु त्यांनी देशाचे राजकारण वगैरे ढवळले नाहि. दिव्या भारती या अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचे सांगतात. त्यावर फार चर्चा झाली नाहि. प्रिया राजवंश या अभिनेत्रीचा तर खूनच झाला. पण त्यामुळे राज्यातही चर्चा झाली नाहि. मग सुशांतच्या मृत्युची इतकी चर्चा आणि इतके राजकारण का व्हावे, हा अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. समाजमाध्यमांचा वाढता प्रभाव हे एक कारण असू शकते. पण सीबीआयने इतके वर्ष खपूनही अजून निष्कर्ष आणले नाहित, हे काही चांगले लक्षण नाहि. फार काळ हे संशयाचे वातावरण रहाता कामाचे नाहि.